शिराळा : चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटन वाढ आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न राहतील, असे मत नवनियुक्त वन परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी व्यक्त केले.
चांदोली (ता. शिराळा) येथील वन भवनमध्ये वनक्षेत्रपाल गोविंद लंगुटे यांचा निरोप समारंभ आणि वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी उखळूचे सरपंच राजाराम पाटील, मोहन पाटील उपस्थित होते.
नलवडे म्हणाले, चांदोलीकडे पर्यटक आकर्षित होण्यासारखं भरपूर काही आहे. त्यामुळे येथील पर्यटन वाढ आणि जैवविविधता संवर्धन करण्याच्या दृष्टीने येथील अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम करत राहीन. इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत चांदोलीचा व्याघ्र प्रकल्प अव्वल आणण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.
वनक्षेत्रपाल लंगुटे म्हणाले, गेल्या तीन-साडेतीन वर्षांत वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून निधी खेचून आणून चांदोलीतील पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. येथील प्रत्येक घटकाने मला सहकार्य केले, त्यामुळे मला चांगल्याप्रकारे काम करता आले.
यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी हारून गार्दी, जयसिंग महाडिक, राजाराम पेरनोले, स्वाती कोकरे, सुनील कुरी, अतुल कांबळे, विठ्ठल खराडे उपस्थित होते.