लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : लॉकडाऊनला कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यातील नागरिक आणि व्यापारी वैतागले आहेत. कोरोनाबाबत कडक निर्बंध घाला, पण व्यापार, व्यवसाय कुठलाही बंद ठेवू नका, अशी मागणी व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांची आहे. राज्य शासन आणि प्रशासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारी, नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शासनाने लॉकडाऊन सुरू केल्यापासून व्यवसाय संपला असून व्यापारी कर्जबाजारी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक चक्र फिरणे थांबले आहे. छोटे-मोठे व्यवसाय बंद केल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येत आहे. सलून, खानावळी, दुकाने, मोटार गॅरेज, इतर दुकाने बंद आहेत. यामुळे हे व्यावसायिक वैतागले आहेत. जगायचे कसे हे सरकारने आम्हाला सांगावे, असा संतप्त सवाल व्यापारी करीत आहेत.
भाजीपाला, किराणा, दुकाने सुरू आहेत. परंतु हे घेण्यासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न ही नागरिक, व्यापारी विचारू लागले आहेत. दुकान भाडे, वीज बिल, कामगार पगार, घरखर्च कुठून आणायचा हे सरकार खर्च देणार आहे का? अशी विचारणाही आता होऊ लागली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात या लॉकडाऊनच्या विरोधात नागरिक, व्यापारी एकत्र येऊ लागले आहेत. रस्त्यावर उतरुन शासनाच्या भूमिकेविरोधात आंदोलनाच्या तयारीत नागरिक आणि व्यापारी आहेत.
शहरात मुख्य चौक ओस पडला आहे. नागरिकांची, ग्राहकांची वर्दळ विरळ झाली आहे. उद्योग, व्यापार अडचणीत आल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
कोट
प्रशासनाने हा लॉकडाऊन शिथिल करावा. कारण गेली दीड वर्ष व्यापारी लॉकडाऊनमध्ये भरडला आहे. व्यापारी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे दिवसातील काही वेळ दुकाने उघडण्यास मुभा द्यावी. आम्ही सर्व नियम पाळून दुकाने सुरू ठेवू. येत्या चार दिवसात जर दुकाने उघडण्यास परवानगी नाही दिली, तर आम्ही शहरातील दुकाने उघडू. आमच्यावर खुशाल केसेस दाखल कराव्यात.
-पांडुरंग पाटील, मर्गदर्शक व्यापारी संघटना, कवठेमहांकाळ.