कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्याचे नाव देशाच्या नकाशात सुवर्णअक्षरांनी कोरले असून, खासदार रामदास आठवले या ढालेवाडीच्या सुपुत्रामुळे हे शक्य झाले आहे. मंगळवारी रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि कवठेमहांकाळ तालुक्यात जल्लोषाला सुरुवात झाली. ढालेवाडी या त्यांच्या जन्मगावी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुका म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो पाचवीला पूजलेला दुष्काळ आणि उजाड माळरान. परंतु या उजाड माळरानातूनच रामदास आठवले यांच्यासारखे समाजकारणातील व राजकारणातील एक चौफेर व्यक्तिमत्त्व राज्याला व देशाला मिळाले आहे. केवळ सहा महिन्यांचे असताना वडिलांचे छत्र हरपलेल्या रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. सततचा दुष्काळ आणि दारिद्र्य यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहही होत नव्हता. त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण आगळगाव येथे घेतले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण वडिलांच्या मामाच्या गावी सावळज येथे घेतले, तर महाविद्यालयीन शिक्षण चुलते दादू आठवले व चुलती आक्काताई यांच्या सहकार्याने मुंबई येथे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दलित पँथरची चळवळ नुकतीच जन्मास आली होती. त्यावेळचे दलित पँथरचे नेते प्रा. अरुण कांबळे यांच्याबरोबर रामदास आठवले यांचा परिचय झाला. तेथूनच त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला सुरुवात झाली. दलित पँथरच्या माध्यमातून रामदास आठवले महाराष्ट्रातील घरा-घरात दलितांचे पँथर म्हणून परिचित झाले. मागासवर्गीयांचे ‘मास लीडर’ म्हणून त्यांची क्रेझ आजही टिकून आहे. १९९0 मध्ये ते शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झाले आणि ढालेवाडीचे नाव संपूर्ण राज्याला समजले. राज्यामध्ये दलित पँथर व रिपब्लिकन पक्ष बळकट करीत असताना, जन्मभूमी असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातही दलित पँथरची चळवळ मोठ्या जोमात आठवलेंच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिली व वाढली. तालुक्यातून आठवले यांना मोलाचे सहकार्य व ताकद देण्याचे काम प्रा. दादासाहेब ढेरे, प्रा. मुकुंद माने, प्रा. अरविंद माने, भगवान वाघमारे, महादेव वाघमारे (गुरुजी), संजय कमलेकर यांनी केले. आता केंद्रीय मंत्रिमंडळात रामदास आठवले यांना सामाजिक न्यायमंत्रीपद मिळाले असून, कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी तालुक्याचे नाव दिल्लीदरबारी पोहोचले आहे. आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने ढालेवाडीत व तालुक्यातील आगळगाव, ढालगाव, कोकळे, कवठेमहांकाळ, कुची आदी ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (वार्ताहर) अपेक्षा वाढल्या... कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी भागाला केंद्रीय मंत्रीपद पहिल्यांदाच मिळाल्याने ढालेवाडी व कवठेमहांकाळ तालुका चर्चेत आला आहे. आठवले यांच्या मंत्रीपदामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न मिटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा येथील जनतेतून व्यक्त केली जात आहे.
आठवलेंमुळे ढालेवाडीचे नाव दिल्ली तख्तावर
By admin | Updated: July 7, 2016 00:20 IST