युनूस शेख -इस्लामपूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्वच जातीची प्रमाणपत्रे देण्याचे काम रखडले आहे. कार्यालयातील अधिकारी या दाखल्यांना हातच लावत नाहीत, अशी अवस्था आहे. अगोदरच दाखला मिळण्यासाठीच्या जाचक अटी, त्यात सेतू कार्यालयातील आॅनलाईन कामकाज व त्यासाठी पडणारा भुर्दंड, यामुळे जनतेचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यात भरीस भर म्हणून अधिकाऱ्यांकडून होणारा विलंब, अशा कात्रीत कामकाजाचा खेळखंडोबा झाला आहे.कामे खोळंबून ठेवणे, नागरिकांना हेलपाटे मारायला लावणे हा या कार्यालयाचा सरकारी शिरस्ताच बनला आहे. एक तर कार्यालय गावाबाहेर. त्यासाठी होणारी पायपीट किंवा इंधनाचा खर्च वेगळाच. कार्यालय तिसऱ्या मजल्यावर. कार्यालयात जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या चढतानाच प्रत्येकाला दम भरतो. त्यामुळे पुढे कार्यालयात जाऊन आपले काम सांगण्याचा दमच त्या व्यक्तीमध्ये उरत नाही. या कार्यालयातून विविध जातीचे दाखले निर्गमीत केले जातात. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून इथल्या दाखल्यांना अधिकाऱ्यांचा हातच लागलेला नाही. पूर्वी एका अधिकाऱ्याने फेटाळलेला दाखला देताना इथल्या अधिकाऱ्यांचे हात पोळले. तेव्हापासून तर हे दाखले देण्याचे काम थंडावले आहे. अधिकाऱ्यांचे हातही दाखल्यावर सही करण्यासाठी वळत नाहीत, इतकी धास्ती बसली आहे. परिणामी त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.जातीचा दाखला मिळण्यासाठी जी कागदपत्रे जमा करावी लागतात, ते एक मोठे दिव्यच असते. १९५0 पूर्वीचा महसुली पुरावा, हे त्यातले सर्वात मोठे बालंट असते. गेल्या ६ महिन्यांपासून जातीच्या दाखल्याची अनेक कामे काहींना काही त्रुटी काढून बाजूला ठेवण्याचे अथवा निकाली काढण्याचे काम सजगपणे सुरु असते. त्यातूनही एखाद्याचा हट्ट वाढला, तर मग ‘काय द्याचं बोला’ची भाषा सुरु होते आणि मगच तो दाखला हातात पडतो. या कार्यालयातील कामकाजाचा खेळखंडोबा झाल्याने इकडे अनेक विद्यार्थ्यांचे जातीचा दाखला न मिळाल्याने मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. मात्र इथल्या अधिकाऱ्यांना त्याची तमा नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून, इथल्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या द्याव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.शिवसेनेचा आंदोलनाचा इशाराप्रांताधिकारी कार्यालयातून सर्वच जातीचे दाखले देण्यास विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, १५ दिवसांच्या आत जातीचा दाखला देण्याची कार्यवाही सुरु न झाल्यास शिवसेना स्टाईलने कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख शकील सय्यद यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांना दिले आहे. यावेळी राजू कोळी, गजानन जाधव, हौसेराव आडके, महंमद शेख, सुनील कापसे, जितेंद्र ढबू, वसीम तांबोळी, दिलीप साळुंखे उपस्थित होते.
जात दाखल्यांची प्रकरणे धुळीत!
By admin | Updated: November 22, 2014 00:03 IST