वाळवा : जगातील २३१ देशांपैकी फक्त सहा देशात देशात द्राक्षे उत्पादन घेतले जाते, तर ४० देशांत मार्केटिंग केले जाते. परंतु योग्य नियोजन व शेतकरी संघटित नसल्याने द्राक्षे बागायतदारांना दर मिळत नाही, म्हणून द्राक्षे बागायतदार कर्जबाजारी आहे, असे प्रतिपादन नाशिक मोहाडी येथील सह्याद्री उद्योग समूहाचे संस्थापक व मार्गदर्शक विलासराव शिंदे यांनी केले.
ग्रामपंचायत सभागृहात आयोजित द्राक्षे बागायतदारांच्या परिसंवादात ते बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष वैभव नायकवडी अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच पोपट अहिर, संजय अहिर, चंद्रशेखर शेळके, डॉ. राजेंद्र मुळीक, डॉ. अशोक माळी, मानाजी सापकर, उमेश घोरपडे, अनिकेत डवंग, धनाजी महाजन, प्रमोद यादव, उमेश कानडे प्रमुख उपस्थितीत होते.
शिंदे म्हणाले, बारमाही नदीचे पाणी उपलब्ध असलेल्या वाळव्याच्या शेतकऱ्यांनी काळानुरूप स्वतः मध्ये बदल करून, निर्यातक्षम दर्जाची द्राक्षे उत्पादीत केली पाहिजेत. एजंट आणि व्यापारी यांच्यामुळे शेतकरी नागवला जात आहे. एजंट दर पाडतात आणि काही मोजके व्यापारी हजारो शेतकऱ्यांना वेठीस धरतात. शेतकरी संघटित पाहिजे. द्राक्षे शेतीचे मार्केटिंग केले पाहिजे. शेतीमध्ये चांगले दिवस येण्यासाठी वाळवा येथे महालक्ष्मी कृषीपूरक उद्योग समूहाच्या माध्यमातुन द्राक्षे बागायतदारांना नवी दिशा मिळू शकते.
गौरव नायकवडी म्हणाले, शेतकऱ्यांनी संघटित राहून योग्य दर मिळविला पाहिजे. त्यासाठी द्राक्षे उत्पादन घेणाऱ्या देशात जाऊन अभ्यास केला पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.
ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे यांनी आभार मानले.