सांगली : जिल्ह्यातील औषध प्रशासन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मागील तीन वर्षांपासून अपुऱ्या संख्याबळामुळे कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. केवळ दोन औषध निरीक्षक जिल्ह्यातील २६०० हून अधिक औषध दुकानांची तपासणी मोहीम राबवित आहेत. ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची सुविधा नसल्याने कित्येकवेळा बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्याचप्रमाणे कार्यालयीन कामामुळे हक्काच्या सुट्या आणि रजेला कित्येकवेळा निरीक्षकांना ‘रामराम’ करावा लागत आहे.विजयनगर परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीत औषध प्रशासनाच्या कार्यालयाचे स्थलांतर झाल्याने त्यांना प्रशस्त जागेचा लाभ झाला असला, तरी रिक्त जागांची मूळ समस्या कायम आहे. सांगली जिल्ह्याचा आवाका लक्षात घेता औषध प्रशासन कार्यालयातील सहाय्यक आयुक्त या पदाकरिता स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी कोल्हापूर येथील औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तपदी असलेल्या ए. एम. खडतरे यांच्याकडे काही महिन्यांपासून सांगलीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. साहजिकच त्यांच्या कामाला मर्यादा येत आहेत. औषध निरीक्षक म्हणून वास्तविक तीन पदे मंजूर असली तरी, सुमारे तीन वर्षांपासून केवळ दोनच पदे भरण्यात आली आहेत. विजय नांगरे आणि जयश्री सवदत्ती या दोन निरीक्षकांकडे सांगलीतील दहा तालुके आणि सांगली परिसराचे कार्यक्षेत्र आहे. सांगली कार्यालयात चार औषध निरीक्षक असावेत, अशी मागणी असली तरी, त्याकडे वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने पाहात नसल्याचेच चित्र आहे. लिपिक पदासाठी मंजूर असलेल्या पाच पदांपैकीही दोन पदे रिक्तच आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज संथ गतीने होत आहे. औषध निरीक्षकांकडे तक्रार आल्यास त्यांना तपासणीसाठी ग्रामीण भागात जावे लागते. परंतु प्रशासकीय कार्यालयाचे वाहन चार वर्षांपासून नादुरुस्त असल्याने त्यांना खासगी वाहनाने किंवा एसटीने प्रवास करावा लागत आहे. काही गावात बस जात नसल्याने प्रसंगी त्यांना पायीदेखील जावे लागते. कारवाईत औषध साठा जप्त केला, तर तो भाड्याच्या गाडीने कार्यालयात आणावा लागतो. या सर्व खर्चाचे बिल मिळण्यासदेखील अपुऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांमुळे विलंब होत आहे. औषध प्रशासनाला रिक्त पदांचे लागलेले ग्रहण कधी सुटणार, याच प्रतीक्षेत औषध प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आहेत. (प्रतिनिधी)कामे रखडलीऔषध निरीक्षकाव्दारे जिल्ह्यातील घाऊक आणि किरकोळ औषध दुकानांची नियमित तपासणी, कार्यरत असणारी अकरा रक्त साठवणूक केंद्रे आणि तेरा रक्तपेढ्यांची पाहणी तसेच नियमितपणे औषधांचे नमुने घेऊन त्याची चाचणी करावी, अशी अपेक्षा आहे. सध्या ही कामे सांभाळून यापूर्वी दाखल असलेल्या खटल्यांच्या प्रकरणात न्यायालयात उपस्थिती, तर प्रसंगी कार्यालयात जनसंपर्क अधिकाऱ्याचेही कार्य निरीक्षकांना करावे लागत आहे.
औषध प्रशासनाला ‘रिक्त’ पदांचे ग्रहण
By admin | Updated: May 25, 2015 00:23 IST