सांगली : टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, जत, मंगळवेढा, सांगोला या दुष्काळी तालुक्यांना साडेतीन टीएमसी जादा पाणी दिले जाणार आहे. हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील काळात उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिली.
जयंत पाटील म्हणाले की, सध्या दुष्काळी तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्यामुळे पिकांचे नुकसान होणार आहे. या दुष्काळी भागामध्ये पुराचे पाणी सोडल्यास तेथील शेतीला त्याचा फायदा होणार आहे. जून ते १५ ऑगस्टपर्यंत कृष्णा आणि वारणा नद्यांमधून कर्नाटकला जवळपास २७५ टीएमसी पाणी वाहून गले आहे. या पाण्याचा उपयोग दुष्काळी तालुक्यांसाठी केल्यास तेथील पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला या तालुक्यांसाठी पावसाळ्यातील दीड टीएमसी पाणी उचलण्यात येणार आहे. या पाण्यामधून साधारणतः ७४ तलाव भरून घेतले जाणार आहेत. हे तलाव भरल्यास आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यांतील उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांसाठी अंदाजे दोन टीएमसी पाणी उचलण्यात येणार आहे. या पाण्यातून लहान व मोठे १५० पाझर तलाव भरले जाणार आहेत. सांगली जिल्ह्याला पुढील काळात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासन सर्व शक्य गोष्टी करीत आहे.