सांगली : सांगली व मिरज परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. शहरातील सखल भागात पाणी साचून राहिले असून, गुंठेवारी भागात अनेकठिकाणी दलदल निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ५ व ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून, मध्यम स्वरुपाच्या पावसाची चिन्हे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरात ढगांची दाटी कायम आहे. गुरुवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजल्यापासून पावसास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली. पावसाची रिपरिप सुरू राहिल्यामुळे शहर जलमय झाले. शिवाजी मंडई, शिवाजी स्टेडिमच्या पूर्वेस, स्टेशन चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक, कोल्हापूर रोड, एसटी स्टँड परिसर याठिकाणी पाणी साचून राहिले. पावसामुळे कमाल तापमानात काहीअंशी घट झाली आहे. गुरुवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३०, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.