सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे एसटी बससेवा सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांना बसमध्ये मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ असे पोस्टर्स लावले आहेत. तथापि महामंडळाच्या या आवाहनाला चालक-वाहकांकडूनच हरताळ फासण्यात येत असल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले. यात प्रवाशीही मागे नाहीत. सांगली बसस्थानकातील एका बसमध्ये सहा प्रवाशांकडेही मास्क नव्हता.
कोरोनामुळे नऊ महिने एसटीची वाहतूक सुरळीत नव्हती. सध्या ती ७० टक्के मार्गांवर पूर्ववत झाली आहे. महामंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे मास्कचा वापर करणाऱ्यांनाच बसमध्ये प्रवेश देण्याबाबत वाहकांना सूचना आहेत. मात्र, ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शुक्रवारी केलेल्या पाहणीत सांगली बसस्थानकामध्ये चालक-वाहकच मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांनाही मास्क वापरण्याबाबत कोणत्याही सूचना करताना दिसून आले नाहीत. सांगली आगारात दुपारी बाराच्या सुमारास बाहेरगावी जाणाऱ्या बसमध्ये अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसून आले. मास्क न वापरण्याबाबत काही चालकांना विचारले असता, त्यांनी कोरोना गेला असल्याचे उत्तर दिले, तर प्रवाशांनीही ९० टक्के कोरोना रुग्ण कमी झाल्याचे उत्तर देऊन मास्कचा वापर बंद केल्याचे सांगितले.
कोट
जिल्ह्यात कोरोनाची तीव्रता होती, त्यावेळी नेहमी मास्क वापरलाच होता. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मास्कचा वापर कमी केला आहे. जेथे गर्दी असते, तेथेच मास्क वापरतो. तसेच लस आल्यामुळे कोरोनाची भीतीही दूर झाली आहे.
- अमोल सूर्यवंशी, प्रवासी.
कोट
प्रवासावेळी बसमध्ये नेहमीच मास्क वापरतो. मास्क जवळच होता. गर्दीच्यावेळी निश्चित मास्कचा मी वापर करतो. इतर वेळी मात्र वापरत नाही. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. मास्क वापरूनही श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे कमी प्रमाणात मास्कचा वापर करत आहे.
- मास्क न घातलेला वाहक, सांगली आगार
कोट
गर्दीच्या ठिकाणीच मी मास्क वापरतो, बस चालविताना मास्क वापरण्याची गरज नसते तसेच आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रवासीदेखील मास्क वापरत नाहीत. वाहकांनी सांगितल्यावरही प्रवासी ऐकत नाहीत.
- मास्क न घातलेला चालक, सांगली आगार.