अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या सहा महिन्यांपासून नेर्ल्यात ‘कृष्णा’च्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सध्या येथे तीन संचालक आहेत. प्रत्येक निवडणुकीत येथून दोन संचालक निवडून जातातच. आता या दोन जागांसाठी तिन्ही गटांतून डझनभर इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.
कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेर्ले (ता. वाळवा) सर्वाधिक मतदानाचे गाव मानले जाते. सध्या सहकार पॅनेलचे गिरीश पाटील (महाडिक गट), दिलीप पाटील (तज्ज्ञ संचालक, राष्ट्रवादी) आणि लिंबाजी पाटील (तांबवे, राष्ट्रवादी गट) हे विद्यमान संचालक आहेत. सहकार पॅनेलकडून १० इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. यामध्ये सयाजी पाटील, महेश पाटील, डॉ. तुुळशीदास पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, जयकर कदम, प्रदीप पाटील (कापूसखेड), हणमंत कुंभार, लिंबाजी पाटील (तांबवे) यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश इच्छुक जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. उरलेल्यांमध्ये सत्यजित देशमुख, शिवाजीराव नाईक, महाडिक गटाचे इच्छुक उमेदवार आहेत.
संस्थापक पॅनेलचे सुभाष पाटील (राष्ट्रवादी) विद्यमान संचालक आहेत. ते इच्छुक आहेतच. त्याचबरोबर वसंतराव पाटील, चंद्रकांत पाटील, शुभम पाटील हे नवीन चेहरे उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. रयत पॅनेलमधून प्रशांत पाटील इच्छुक असल्याचे दिसते.
‘कृष्णा’च्या रणांगणात नेर्ले गावचे मतदान निर्णायक मानले जाते. सहकार पॅनेलचे डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले संपर्क ठेवून आहेत. संस्थापक पॅनेलचे प्रमुुख अविनाश मोहिते उमेदवारांंची चाचपणी करीत आहेत. रयत पॅनेलचे डॉ. इंद्रजित मोहिते यांनीही नेर्ले गटावर लक्ष केंद्रित केले असून, सहकार पॅनेलमधील नाराज हाताशी लागण्यासाठी तयारी केली आहे.
कोट
इच्छुकांची संख्या पाहता, निवड करण्याचे आव्हान आहे. नेर्लेतून बहुतांशी इच्छुक उमेदवारांनी कृष्णा उद्योग समूहात संपर्क वाढविला आहे. योग्य निकष लावूनच उमेदवार निवडला जाईल.
- डॉ. अतुल भोसले, गटनेते, सहकार पॅनेल
कोट
नेर्ले गटातून तिन्ही पॅनेलमधून उमेदवारी मिळविण्यासाठी आमचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. आम्ही कोणाचीही शिफारस करणार नाही. तिन्ही गटांच्या नेत्यांनी योग्य उमेदवार निवडावा.
- राहुल महाडिक, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था.