सांगली : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असताना, एसटी महामंडळ प्रशासनातर्फे पुढील आठवड्यात १०० चालक-वाहकांना मुंबईला पाठविले जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयास कर्मचारी संघटनेकडून तीव्र विरोध होत असून अनेक चालक-वाहक मुंबईची ड्युटी नकोच, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भूमिका मांडत आहेत. मुंबईहून आल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे, या कर्मचाऱ्यांमधून मुंबईला ड्युटीला जाण्यासाठी प्रचंड विरोध होत आहे.
मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी सांगली विभागातून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात २०० चालक आणि २०० वाहक पाठविले होते. यापैकी १०५ चालक व वाहक पॉझिटिव्ह आले होते. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक त्रास झाला होता. सांगली विभागाच्या ५० बसेस बेस्टच्या सेवेतच असल्यामुळे पुढील आठवड्यात ५० चालक आणि ५० वाहकांना पाठविण्यात येणार आहे. सध्या मुंबई, ठाणे येथे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चालक-वाहकांच्या मनामध्ये मोठी भीती आहे. परिणामी, यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य खालावले आहे. सुरुवातीपासूनच मुंबईला जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे. आता तर आठऐवजी १५ दिवस सेवा बजाविण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळेच चालक-वाहक मुंबईची ड्युटी म्हटले की, नकोच म्हणत आहेत. अनेक जण मुंबईची ड्युटी रद्दसाठी अनेक फंडे शोधून काढत आहेत. सांगलीत डबलड्युटी द्या, पण मुंबईची नको रे बाबा... असेच म्हणताना दिसत आहे.
कोट
सांगली विभागातील कर्मचारी मुंबई येथे बेस्टच्या वाहतुकीला जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही यातून लागण होत आहे. आता तर आठ दिवसांऐवजी १५ दिवस मुंबईला जाण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आमच्या विभागावर अन्याय होत आहे. हे आदेश रद्द व्हावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. अन्यथा, संघटनेतर्फे महामंडळाविरोधात आंदोलन पुकारण्यात येईल.
-अशोक खोत, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
कोट
ठाणे आणि मुंबईत कोरोनाची परिस्थिती खूप भयावह आहे. खूप भीतीने काम करावे लागते. मात्र, योग्य ती काळजी आणि खबरदारी घेऊनही अनेक कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. महामंडळ प्रशासनाने तत्काळ आमची मुंबईची सेवा थांबवावी.
-एक वाहक, सांगली आगार
कोट
सांगलीसह अन्यत्र सेवा करूनही कोरोनाची लागण न झालेल्या कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवा बजावण्यासाठी गेल्यावर कोरोना झाला आहे. या संसर्गामुळे काही कर्मचाऱ्यांची प्रकृती खूप खराब झाली. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने मुंबईची सेवा थांबविणे गरजेचे असून, अन्यथा कर्मचारी आंदोलन पुकारतील.
-एक चालक, सांगली आगार
चौकट
गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातून ४०० जणांना पाठवले.
चालक २००
वाहक - २००
-मुंबईहून परत आल्यानंतर आढळले १०५ पॉझिटिव्ह
चौकट
परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास
मुंबईहून आल्यानंतर १२५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईतील वातावरणाचाही इतर कर्मचाऱ्यांना त्रास होऊन आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईची ड्युटी नको रे बाबा, असा कर्मचाऱ्यांमधून सूर उमटत आहे.