इस्लामपूर : राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांच्या नावांमधून अस्तित्वात असलेली जातीची ओळख पुसून काढण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र त्याचवेळी अशा वस्त्यांना महापुरुषांच्या जातीनुसार नावे देऊन महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले जाऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य चिटणीस अरुण कांबळे यांनी केली आहे.
कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये, जातीची भेदभावजनक आणि अवमानकारक ओळख प्रामुख्याने कनिष्ठ समाजघटकात आहे. त्यामुळे अनेक वस्त्यांची नावे हीन स्वरुपाच्या जातीवाचक पद्धतीची आहेत. नव्या निर्णयानुसार या वस्त्यांना भीमनगर, ज्योतीनगर, फुलेनगर, शाहूनगर अशी नावे देण्यात येणार आहेत. त्यामुळे जातीवाचक नावे बदलून त्याचठिकाणी महापुुरुषांची नावे देणे योग्य दिसत नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबरला आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी न करता आपल्या घरी थांबूनच आंबेडकरांना अभिवादन करावे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरप्रेमींनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अरुण कांबळे यांनी केले आहे.