सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर विश्वासघातकीपणाचे राजकारण केल्यामुळेच पक्षाचे नुकसान झाले आहे. काँग्रेस पक्ष टिकवायचा असेल, तर राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडून स्वतंत्र लढले तरच पक्षाला चांगले दिवस येतील, अन्यथा पक्ष नावालाही जिल्ह्यात शिल्लक राहणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक आमदार रामहरी रूपनर यांच्यासमोर व्यक्त केल्या. विधानसभा निवडणुकीसंबंधी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पक्षनिरीक्षक रामहरी रूपनर सांगलीत आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणून घेतली़ यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने विश्वासघातकी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करू नका, अशी सडेतोड मते मांडून भूमिका स्पष्ट केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीला आघाडी चालते, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत तुमची आघाडी का चालत नाही. आमची डोकी फोडता आणि तुमच्या सोयी पाहता का? असा सवालही कार्यकर्त्यांनी नेत्यांना केला. हणमंतराव पाटील यांनी पक्ष अडचणीतून जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते पायात पाय घालून काँग्रेस कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडी करू नका, असे मत मांडले. विशाल घोलप यांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देऊन काँग्रेस पूर्वीप्रमाणे सर्व जागा देण्याची मागणी केली. वाळवा तालुकाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आघाडी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र का लढता, असा नेत्यांना सवाल केला. हंबीरराव पाटील म्हणाले की, पक्ष वाढीसाठी नियमित कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची मागणी केली. कुंडलचे श्रीकांत लाड म्हणाले की, राज्यात सत्ता काँग्रेसची, राज्य बँक, सहकार खातेही पक्षाकडे आहे. तरीही तासगाव कारखान्याचा निर्णय होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांत असंतोषाचे वातावरण आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोस्त म्हणून बरोबर घेतले, त्यांनीच काँग्रेस संपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे थांबले पाहिजे. पलूस तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, मिरज पंचायत समितीचे सभापती सुभाष पाटील, अमरसिंह पाटील यांनी पक्ष टिकवायचा आणि वाढवायचा असेल, तर काँग्रेसने विधानसभा स्वतंत्र लढविली पाहिजेत, अशी भूमिका मांडली. यावेळी लक्ष्मण नवलाई, करीम मिस्त्री, रफिक मुजावर, विशाल पाटील, राजू मोरे, कवठेमहांकाळचे आप्पासाहेब शिंदे यांनीही काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढवण्याची मागणी केली. वसतंतराव गायकवाड, राहुल गायकवाड, रवींद्र देशमुख, अॅड. किसनराव निकम यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याची मागणी केली. यावेळी महापौर कांचन कांबळे, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते, ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटील, माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, सभापती राजेश नाईक, काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलजा पाटील, मालन मोहिते, भीमराव मोहिते, आनंदराव मोहिते, माजी आ. हाफिज धत्तुरे, उमाजीराव सनमडीकर, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विश्वासघातकी राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको
By admin | Updated: August 3, 2014 01:49 IST