सांगलीत कोविड रुग्णालयांबाहेर ऑक्सिजन संपल्याने रुग्णाला अन्यत्र नेण्याची सूचना देणारे फलक लागले होते. नवा रुग्ण घेणार नसल्याचेही म्हटले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी चिंता व्यक्त होत असतानाच जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी कर्नाटकातील बेल्लारी येथून ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित सुरु ठेवण्यात यश मिळवले आहे. रविवारी बहुतांशी कोविड रुग्णालयांनी ऑक्सिजन नसल्याचे सांगत नव्या रुग्णांना दाखल करून घेणे थांबविले आहे. रविवारी दुपारी सर्रास रुग्णालयात जेमतेम तीन ते चार तासांचा ऑक्सिजन शिल्लक होता.
ऑक्सिजनच्या टंचाईमुळे डॉक्टरांचेही धाबे दणाणले आहेत. ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन रात्रं-दिवस प्रयत्न करत आहे. बेल्लारीतील ऑक्सिजनपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरु होते. त्यास यश मिळाले. रुग्णालयांची दररोजची गरज सरासरी ४० टनांवर पोहोचलेली असताना पुरवठा मात्र २० टनांहून कमी होत आहे. त्यामुळेच प्रशासनाने हा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना महामारीच्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत प्रथमच अशी कसरत सुरु आहे. रविवारी सकाळपासून सांगली-मिरजेतील बहुतांश कोविड रुग्णालयांबाहेर ऑक्सिजन संपल्याचे फलक झळकले होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी अन्य रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था पाहून रुग्णाला शिफ्ट करावे अशा सूचना फलकावर लिहिल्या होत्या.
चौकट
शनिवारपासूनच टंचाई
‘लोकमत’ प्रतिनिधीने ऑक्सिजनची उपलब्धता तपासण्यासाठी रविवारी दुपारपासून सांगली-मिरजेतील सर्वच कोविड रुग्णालयांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, तेव्हा सर्वांनीच ऑक्सिजनची टंचाई असल्याचे सांगितले. तरीही प्रशासनाकडून प्रयत्न झाल्याने रुग्ण व नातेवाईकांना सोमवारी दिलासा मिळणार आहे.
चौकटऑक्सिजन ऑडिटच्या घोषणाच
ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी वारंवार केल्या आहेत. वापर काटेकोरपणे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, पण त्याबाबत फारशा हालचाली झाल्याचे दिसत नाही. कोरोनामध्ये समाजसेवा करण्याची संधी साधण्यासाठी गावोगावी तसेच सांगली-मिरजेत गल्लोगल्ली कोविड सेंटर्स निघाली. तेथे प्रत्येक बेडला ऑक्सिजन सिलिंडर लावून ठेवला आहे. त्याच्या वापरावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची धक्कादायक माहिती काही डॉक्टरांनी दिली.
चौकट
पोलीस बंदोबस्तात टॅंकर
ऑक्सिजनच्या आणीबाणीच्या स्थितीमुळे टॅंकर्सना पोलीस बंदोबस्त द्यावा लागत आहे. रविवारी सकाळी ११ टन ऑक्सिजन घेऊन आलेला टॅंकर सांगली, इस्लामपूर व शिराळा येथे वाटप करत फिरला. त्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. बेल्लारीहून येणाऱ्या टॅंकर्सनादेखील कडक बंदोबस्त देण्यात आला आहे. ऑक्सिजन वाटपावरील नियंत्रणासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार प्लांटमध्येच ठिय्या मारून आहेत.
चौकट
कोल्हापूरची सीमाबंदी, सिव्हिल सलाईनवर
कोल्हापूरमधील ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पांनी जणू सीमाबंदीच स्वीकारली आहे. तेथून सांगलीसाठी ऑक्सिजन पुरवठा थंडावला आहे. सांगली शासकीय रुग्णालयाला तेथून काही प्रमाणात पुरवठा होतो. तो कमी झाल्याने प्रशासन सलाईनवर आहे. रविवारी सकाळी २५ सिलिंडर उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला. अद्याप ५० सिलिंडरसाठी प्रतीक्षा आहे. मिरज कोविड रुग्णालयात एकूण १६ हजार लिटरच्या दोन टाक्या असल्या तरी साठा कमी झाला आहे.
कोट
जिल्ह्यात ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता आहे. रविवारी सकाळी एक टॅंकर आला असून बेल्लारीहून आणखी एक टॅंकर निघाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी किंवा डॉक्टरांनी ऑक्सिजनसाठी समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ऑक्सिजन संपल्याविषयी कोणीतरी हेतूपुरस्पर माहिती पसरवत आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी