इस्लामपूर : शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्ता राष्ट्रवादीच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ताब्यात घेताना बेकायदेशीर ठराव केले होते. हे ठराव बेकायदेशीर ठरवत विकास आघाडीच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी या मालमत्ता ताब्यात घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. या ठरावाविरुद्ध राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे चारही अर्ज फेटाळून लावल्याचा निकाल दिला आहे, अशी माहिती नगरसेवक वैभव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासाठी धक्कादायक असल्याचे पवार म्हणाले.
ते म्हणाले, पालिकेतील जयंत पाटील समर्थक तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विजय पाटील हेल्थ क्लब, जयंत पाटील एन. ए. कला, क्रीडा मंडळ आणि विजयभाऊ पतसंस्थेखालील टॉयलेट ब्लॉक या इमारती बेकायदेशीरपणे ठराव करून ताब्यात घेतल्या होत्या. तर बाजारमाळमध्ये सुसज्ज भाजी मंडई करण्याचा ठराव विकास आघाडीने केला होता. या तीन इमारती आणि बाजारमाळमधील सुसज्ज भाजी मंडई उभारण्याच्या ठरावाविरुद्ध राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून अपील दाखल केले होते.
ते म्हणाले, नगरपालिकेतील जयंत पाटील समर्थक तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करत बेकायदेशीर ठराव करून पालिकेच्या मालकीच्या तीन मालमत्ता नाममात्र भाड्याने अनेक वर्षांपासून वापरल्या होत्या. त्यामुळे पालिकेचे आणि शहराचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. पालिका सभेत या गैरकारभाराविरुद्ध कागदोपत्री पुराव्यासह या इमारती ताब्यात घेण्याची मागणी आपण केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी पालिका तरतुदीतील अधिनियमांचा दाखला देत तत्कालीन सत्ताधाऱ्यांचे हे ठराव कायदेशीरपणे रद्द करून या इमारती ताब्यात घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र, दबावाखाली असलेल्या प्रशासनाने या मालमत्ता ताब्यात घेण्यास असमर्थतता दर्शवली होती.
राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या चार अर्जांवर सुनावणी झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे चारही अर्ज फेटाळण्यात आल्याचा निकाल दिला. यावेळी विजय पवार, अजित पाटील उपस्थित होते.