लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेने नूतनीकरणावर केलेल्या खर्चासह अन्य तक्रारींबाबत चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. याबाबतची तक्रार बँकेचे विद्यमान संचालक आ. मानसिंगराव नाईक यांनी केली आहे.
सहकार आयुक्त व निबंधकांकडे नाईक यांनी ५ एप्रिल २०२१ रोजी निवेदन दिले होते. त्यावर २४ ऑगस्टला चौकशीचे आदेश कवडे यांनी दिले आहेत. नाईक यांच्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेतील इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय व शाखांमधील फर्निचर खरेदी, एटीएम मशिन्स, नोटा मोजण्याचे मशिन आदी बाबींवर आवश्यकता नसताना ३० ते ४० कोटी रुपये खर्च केला आहे.
बँकेतील लिपिक व शिपाई पदाच्या भरतीला परवानगी देण्यात येऊ नये, अशीही मागणी नाईक यांनी केली आहे.
नाईक यांच्यासह स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनीही केल्या तक्रारींच्या चौकशीचे आदेश कवडे यांनी दिले आहेत. फराटे यांनी बँकेच्या संचालकांच्या कारखान्यांना दिलेले ३२ कोटींचे कर्ज, संस्थांचे संगणकीकरण, बँक नूतनीकरण, महांकाली साखर कारखान्याकडील कर्जाची थकबाकी, स्वप्नपूर्ती शुगर्स या खासगी कारखान्यास चुकीच्या पद्धतीने दिलेले २३ कोटींचे कर्ज याविषयी तक्रार केली आहे.
कवडे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८१ अन्वये चाचणी लेखापरीक्षण किंवा ८३ अन्वये सखोल चौकशी करावी व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश दिले आहेत.