सांगली : जिल्ह्यातील केशरी कार्डधारकांना धान्याचे वाटप करून काही धान्य रास्त दुकान व गोदामात शिल्लक आहे. आता शासनाच्या निर्देशानुसार दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या एपीएल केशरी सवलतीच्या दराचे धान्य शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती देण्यात येणार आहे. त्यात एक किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दराने गहू ८ रुपये प्रतिकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो वितरित करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे.
----
पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने बैठक लांबणीवर
सांगली : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा वाढतच चालल्याने जिल्ह्यात आणखी काही निर्बंध शिथिल हाेण्याची शक्यता मावळली आहे. प्रशासनाला या आठवड्यात पुन्हा एकदा आढावा घेऊन निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील प्रयत्नशील होते. मात्र, साडेनऊ टक्क्यांवर आलेला पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा १३ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे आज, गुरुवारी होणारी बैठक पुन्हा लांबणीवर गेली आहे.
----
पाचवीच्या वर्गासाठी प्रवेश सुरू
सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षाभरापासून शैक्षणिक कामकाज ठप्प झाले असले तरी यंदा शाळांकडून पाचवीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज, गुरुवारपासून ग्रामीण भागातील अनेक शाळांत पाचवी व आठवीसाठी प्रवेश सुरू होणार आहेत. इतर इयत्तांच्या प्रवेशाबाबत शाळांनी तयारी केली असली तरी त्याचे स्पष्ट निर्देश अद्याप मिळाले नाहीत.
----
सांगलीत जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई
सांगली : शहरातील कर्नाळ रोडवरील एका गॅरेजच्या बोळात जुगार खेळणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विक्रम खोत यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांकडून रोख ४८० रुपये व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
----
जत, तासगाव तालुक्यांत अवैध दारूविक्रीवर कारवाई
सांगली : बंदी असतानाही जत व तासगाव तालुक्यांत अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. तासगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी दारूच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या, तर जत पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी दारूच्या ४० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून रोख ३०० रुपयांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.