म्हैसाळ : मिरज तालुका राष्ट्रवादीच्या वतीने ढवळी गावात पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था व जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले. मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला.
महापुरामुळे ढवळीतील ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. गावाबाहेरील मोकळ्या प्लाॅटमध्ये जनावरांच्या सोबत अनेक कुटुंब राहत आहेत. त्यांच्या जेवणाची व जनावरांना चाऱ्याची व्यवस्था मिरज तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. शिंदे-म्हैसाळकर यांनी ढवळी येथील तलाठी प्रवीण कुंभोजे यांना पंचनामे व्यवस्थित पध्दतीने करा व पूरबाधित ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही यांची काळजी घ्या, अशी सूचना केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, मिरज तालुकाध्यक्ष तानाजी दळवी, युवकचे तालुकाध्यक्ष शिवाजी महाडिक, सरपंच बाळासो चिपरे, अमोल चौगुले, प्रणव पाटील उपस्थित होते.