सांगली : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि. २१ रोजी ऑनलाइन होणार आहे. मात्र, ऑनलाइन सभेत प्रश्न मांडण्यात अडचणी येतात. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाल्यामुळे सभा ऑफलाइनच घेण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे सदस्य अरुण राजमाने, अरुण बालटे, सरदार पाटील हे आक्रमक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांचीही ऑफलाइन सभेची मागणी आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग कमी झाल्यास सभा ऑफलाइन घेतली जाईल, असे जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी सदस्यांना आश्वासन दिले आहे.
राजमाने म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सभागृहाला साडेचार वर्षांचा कालावधी झाला आहे. सभागृहाचे शेवटचे सहा महिने आहेत. त्यामुळे उर्वरित कामे तत्काळ मार्गी लागली पाहिजेत, अशी सर्वच सदस्यांची अपेक्षा आहे. पावसाळा तोंडावर आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील पावसाळ्यापूर्वीची अनेक कामे प्रलंबित आहेत. वारंवार याबाबत सांगूनही जाणीवपूर्वक मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी सविस्तर चर्चा करून कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, ऑफलाइन सभा घेऊन आमचे तोंड दाबण्यासाठी काही जण जाणीवपूर्व षड्यंत्र रचत आहेत. राजकारणापेक्षा लोकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. ऑनलाइन सभेमुळे चर्चेवर मर्यादा येतात. अनेक भागात नेटवर्किंगच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सभेत मत मांडताना मर्यादा येतात. काही वेळेला प्रश्न मांडताही येत नाही. ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे सुरू असणारा कारभार चालू देणार नाही. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या थोडी कमी आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर अशा नियमांचे कडक निर्बंध घालून कोणत्याही परिस्थितीत सभा ऑफलाइनच घ्या, अशी मागणी केली आहे.
याबाबत अध्यक्षा कोरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, कोरोनाच्या साथीमुळे २१ जून रोजी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कालावधीत संसर्ग कमी झाल्यास ऑफलाइन सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.