सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा रद्द करण्याची नामुष्की सभापती संजय मेंढे यांच्यावर गुरुवारी आली. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेच्या सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला. विकासकामे होत नसल्याने सभेला गैरहजर राहिल्याचा दावा सदस्यांनी केला असला, तरी या बहिष्कारामागे आर्थिक गणित असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. महापालिकेत महिन्याभरात दोनदा सत्ताधारी काँग्रेसवर नामुष्कीची वेळ आली. या महिन्यातील महासभाच महापौर विवेक कांबळे यांनी विषय नसल्याचे कारण देत रद्द केली होती. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच स्थायी समिती सभापती संजय मेंढे यांच्यावरही हीच वेळ आली. गुरुवारी स्थायी समितीची सभा होती. या सभेची विषयपत्रिका तीन दिवसांपूर्वीच सदस्यांच्या घरी पोहोच करण्यात आली होती. सभेसाठी सभापती मेंढे सकाळी साडेदहा वाजताच त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते. सकाळी साडेअकरा वाजता सभेला सुरुवात झाली. मात्र, सभापती मेंढे व नगरसेवक सुरेश आवटी वगळता एकही सदस्य सभेला हजर नव्हता. विशेष म्हणजे या सभेला प्रथमच सर्वच विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. आवटी यांनी, सभा सुरू करूया. सर्व सदस्य आपलेच आहेत. ते विषयांना मंजुरी देतील, असे म्हणणे मांडले; पण नगरसचिवांनी कोरम पूर्ण झाल्याशिवाय सभा सुरू करता येणार नाही, असे सुनावले. दहा ते पंधरा मिनिटे वाट पाहूनही सदस्य आले नाहीत. (पान १ वरून)अखेर सभापती मेंढे यांनी सभा रद्द केल्याचे जाहीर केले. स्थायी समिती सभेसाठी अनेक सदस्य महापालिका मुख्यालयात हजर होते. सत्ताधारी गटाच्या अनारकली कुरणे, दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे विष्णू माने, आशा शिंदे हे सदस्य सभापतींच्या दालनात होते. काही सदस्यांनी मुख्यालयाकडे पाठ फिरविली होती; तर काहीजण इतरत्र फिरत होते. परंतु, त्यांनी सभेला उपस्थित न राहता बहिष्कार टाकला. सदस्यांनी प्रभागात लग्न, बारशांचे कार्यक्रम असल्याने सभेला उशिरा पोहोचल्याचा युक्तिवाद केला. अर्थकारणातून बिघाडीस्थायी समिती म्हणजे ‘अंडरस्टँडिंग’ समिती असल्याचा बोलबाला आहे. कोट्यवधी रुपयांची कामे या समितीकडून मंजूर केली जातात. त्यातून टक्केवारीचा पायंडा पडला आहे. या रकमेच्या हिशेबावरून सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. स्थायी सभेची विषयपत्रिका सदस्यांना पोहोच झाली होती. सभा सकाळी साडेअकरा वाजता आहे, हे सर्वांना माहीत होते. तरीही सदस्य सभेला गैरहजर राहिले. याबद्दल त्यांनाच विचारावे लागेल.- संजय मेंढे, सभापती, स्थायी समिती
स्थायी समिती सभा रद्दची नामुष्की
By admin | Updated: May 22, 2015 00:07 IST