कुपवाड : दीपावलीमध्ये लहान-थोरांकडून फटाक्यांची मोठ्याप्रमाणात आतषबाजी होते. हे फटाके म्हणजेच स्फोटकाचे छोटे रूपच. या फटाक्यांमुळे हवा आणि आवाजाचे प्रदूषण होते. या प्रदूषणाचा मानवाला आणि सृष्टीला खूप त्रास होतो. ‘त्यामुळेच आपण लुटायची मजा, कोणाला तरी होते सजा’ असे कदापीही होऊ देणार नसल्याची शपथ शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या विद्यार्थ्यांनी घेतली. सृष्टीच्या हितासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.कुपवाडमधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक ही स्वातंत्र्यसैनिकांची शाळा म्हणून परिचित आहे. शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये देशासाठी चांगले योगदान दिले. त्या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच शाळा क्रमांक एकमधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यंदाच्या दीपावलीमध्ये प्रदूषण नियंत्रणाबरोबरच फटाके न उडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मागीलवर्षी त्यांच्याच शाळेतील एका सवंगड्याला दीपावलीमध्ये फटाके उडविताना इजा झाली होती. त्यामध्ये त्याला बरेच दिवस रुग्णालयात घालवावे लागले होते. या घटनेतून बोध घेत येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यंदा प्रदूषण आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शपथही घेतली.प्रतिज्ञेवेळी विद्यार्थ्यांबरोबरच प्रभारी मुख्याध्यापक महादेव हेगडे, बाळासाहेब गायकवाड, अण्णासाहेब जाधव, शिखरजी लखणे, हनुमंत सनगर, विजया शिंदे, रत्ना हेगडे, शारदा आडके, रंजना कांबळे, सुचित्रा कुंभार आणि रेश्मा खतीब हे शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, केंद्रप्रमुख शशिकांत नागरगोजे यांचे मार्गदर्शन लाभले. याबरोबरच या शाळेने इतरही आदर्श असे उपक्रम राबवून जिल्ह्याबरोबरच राज्यात नाव उंचावले आहे. राज्यातून पाचशेहून अधिक शिक्षकांनी उपक्रमाची माहिती घेण्यासाठी या शाळेला भेटी दिल्या आहेत. (वार्ताहर)शाळेचे अभिनव उपक्रमशाळेने परिसरात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. निर्माल्यापासून सेंद्रीय खतांचा उपक्रम राबविला आहे. स्वतंत्र संचलन युनिटसह झांज, लेझीम आणि बँडपथक निर्माण केले आहे. ज्ञानरचना वादावर आधारित अध्यापन पध्दतीचा वापर केला आहे, असे शिक्षक बाळू गायकवाड यांनी सांगितले.
कुपवाडच्या विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्तीचा संकल्प
By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST