सांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे शिक्षणाचा सगळाच बोऱ्या वाजलेला असताना आता परीक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पदविका अभियांत्रिकी व फार्मसीच्या परीक्षा एप्रिल-मे दरम्यान होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महाविद्यालयांपुढे आहे.
डिप्लोमा व फार्मसीचे शिक्षण सध्या ऑनलाईन सुरू आहे. बहुतांश महाविद्यालयांनी ८० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम ऑनलाईनच पूर्ण केला आहे, पण परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात की ऑफलाईन याविषयी मतमतांतरे आहेत. महाविद्यालये सोमवारपासून (दि. १५) सुरू होतील असे शासनाने जाहीर केले आहे, पण उपस्थितीसाठी ५० टक्क्यांची अट आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कसरती कराव्या लागणार आहेत. फार्मसीसाठी दुसऱ्या, तिसऱ्या व अंतिम वर्षांच्या परीक्षेचे फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे, पण वेळापत्रक अद्याप निश्चित नाही. पहिल्या वर्षाच्या परीक्षांचीही निश्चिती अजून नाही.
हे दोन्ही अभ्यासक्रम व्यावसायिक स्वरूपाचे असल्याने परीक्षेपुरते त्यांचा अभ्यासक्रम शंभर टक्के पूर्ण झाला पाहिजे असा महाविद्यालयांचा सूर आहे. फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे, अशीही भूमिका आहे, अन्यथा तो कौशल्यामध्ये कमी पडण्याची भीती आहे.
पॉईंटर्स
पॉलिटेक्निक महाविद्यालये - १७
प्रवेश घेतलेले विद्यार्थी - ४६२८
फार्मसी महाविद्यालये - १५
प्रवेश घेतलेले विद्यार्थी - ३८५५
कोट
डिप्लोमाचे शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. तांत्रिक शिक्षणक्रमामुळे ऑनलाईन शिक्षण पुरेसे नाही, वर्गातच तो शिकवायला हवा, अन्यथा परीक्षेत टिकाव लागणार नाही.
- विशाल कणसे, डिप्लोमा विद्यार्थी.
कोट
ऑनलाईनमुळे अभ्यास पुरेसा झालेला नाही. वर्ग सुरू झाल्यानंतरही पन्नास टक्क्यांनाच प्रवेश आहे, त्यामुळेही अभ्यासात त्रुटी राहतील. गुणवत्तेसाठी परीक्षा लांबणीवर टाकायला हव्यात.
- स्नेहल काशीद, डिप्लोमा विद्यार्थी
कोट
शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरच परीक्षा झाल्या पाहिजेत. परीक्षेचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही, त्यामुळेही अभ्यासाला दिशा नाही.
- कविता मांजरे, फार्मसी विद्यार्थिनी
कोट
सोमवारी कॉलेज सुरू झाल्यावर अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार यावरच परीक्षेचे भवितव्य आहे. ऑनलाईन अभ्यासामुळे परीक्षाही ऑनलाईनच झाल्या पाहिजेत. शिवाय शंभर टक्के अभ्यासक्रमाची सक्ती करू नये.
- अनया वाळेकर, फार्मसी विद्यार्थिनी
कोट
फार्मसीचा अभ्यासक्रम व्यावसायिक असल्याने फक्त परीक्षेपुरता विचार व्हायला नको. विद्यार्थी कौशल्यपूर्ण होण्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण व्हायला हवा. अर्थात विद्यापीठाच्या सूचनांनुसार कार्यवाही केली जाईल.
- प्रा. सचिन साजणे, उपप्राचार्य, डांगे फार्मसी महाविद्यालय, आष्टा
कोट
परीक्षांबाबत अद्याप निश्चिती नाही. बहुतांश अभ्यास ऑनलाईन झाला आहे. शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- प्रा. अमोल विभूते, तासगाव तंत्रनिकेतन.
-------------