दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील विकासकामात भाजप व राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांचा प्रामुख्याने वाटा आहे. दिघंचीत एकूण १७ सदस्य आहेत. त्यापैकी ११ सदस्य भाजप व राष्ट्रवादीचे आहेत. बहुमताने ठराव पास केल्याशिवाय विकास कामे होत नाहीत. अल्पमतातील सत्ताधारी गटाने तसेच सरपंच अमाेल माेरे यांनी विकासकामाचे श्रेय घेऊ नये. यापेक्षा जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, असा इशारा भाजपच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भाजपचे सदस्य म्हणाले. सरपंच अमोल माेरे यांनी दिघंची गावाला एक दिवसाआड शुध्द फिल्टरचे पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते. सध्या आठवड्यातून एकदा तेही गाळमिश्रित पाणी मिळत आहे. बसस्थानकासाठी अद्ययावत पिकअप शेडही अद्याप झालेले नाही. मंजूर झालेल्या पेयजल योजनेवरून राजकारण सुरू आहे. सरपंच कोणा गटाचे प्रमुख नाहीत. त्यांनी गटबाजीचे राजकारण करीत राजकीय तमाशा करू नये. दिघंचीत शांतता ठेवावी. दिलेली आश्वासने पूर्ण करावीत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य केशवराव मिसाळ, प्रणव गुरव, अजित मोरे, चंद्रकांत पुसावळे, सावंता पुसावळे, सयाजी मोरे, सोपान काळे, नानाभाऊ मेनकुदळे उपस्थित होते.