अमोल काटे
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : अंगात धमक असली की पैसा आणि शिक्षण यांची कमी असली तरी माणूस मोठ्या हिमतीने पुढे जाऊ शकतो. हीच कहाणी प्रत्यक्ष अनुभवास आली ती म्हणजे दिघंची (ता. आटपाडी) येथील प्रशांत पांडुरंग चोथे यांच्या परिश्रमातून. जन्मत:च पायाची शीर आखूड असल्याने त्यांना उठता व चालताही येत नव्हते. पायाच्या पंज्यावर भार देत धडपड करत सलग बारा ते पंधरा वर्षे चालण्याचा सराव केला आणी चोथे पायावरचं नाही तर जीवनातही सक्षम पणे उभे राहिले.
चोथे यांचे दोन्ही पाय जन्मतःच आखूड असल्याने त्यांना टाच टेकवता येत नव्हती. पायाच्या शिरेची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता; पण शस्त्रक्रियेसाठी एका पायाला ५० हजार रुपये खर्च होता शिवाय किमान एक वर्ष तरी त्यांना घरीच बसावे लागणार होते. एवढे करूनही डॉक्टरांनी कोणतीही खात्री देण्यास नकार दिला होता. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शस्त्रक्रियेसाठी एक लाख आणायचे कुठून, असा प्रश्न चोथे यांच्या समोर उभा राहिला.
अशा परिस्थिती त्यांनी मनात जिद्द बाळगुण पायावर चालायचे ठरवले. १९९९ मध्ये त्यांनी दहावी पूर्ण केली व रोज पहाटे चार किलोमीटर असे सलग १५ वर्षे चालून त्यांनी आपला पाय जमिनीवर टेकला व जिद्द पूर्ण केली. या माध्यमातुन त्यांनी जीवन कसे जगावे याचेही त्यांनी उदाहरण सर्वांपुढे घालून दिले. चोथे यांचे वय ३८ वर्षे आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते लाईट फिटिंगचे व पिग्मी एजंटचे काम करत आहेत.
कोट
अपंगावर मात करण्यासाठी एकच उपाय म्हणून मनात जिद्द बाळगून सलग १५ वर्षे पायासाठी कष्ट घेऊन व्यायाम करून पाय जमिनीवर टेकविले व स्वतःच्या पायावर उभा राहिलो. इतरांनीही अपंगत्वावर मात करण्यासाठी कष्ट घ्यावे. जिद्द बाळगावी. कष्टाचे फळ निश्चित मिळते.
- प्रशांत चोथे, दिघंची