इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत माजी मंत्री जयंत पाटील, अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली ३१ वर्षांच्या सत्ताकाळात शहराचा शाश्वत विकास सत्ताधारी गटाने केला आहे. राज्यातील अनेक पुरस्कार पटकावून नगरपालिकेने नावलौकिक मिळवला आहे. शहराला देशातील आदर्श शहर बनविण्याचा प्रयत्न यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती प्रा. शामराव पाटील यांनी दिली. इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द करुन ते पत्रकारांशी बोलत होते. प्रा. पाटील म्हणाले, ३१ वर्षांच्या सत्ताकाळात नागरिकांना पायाभूत सुविधा देतानाच विकासाचे अनेक टप्पे पार केले आहेत. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत जनतेने प्रचंड बहुमताने एकहाती सत्ता देऊन आपला विश्वास व्यक्त केला आहे. जयंत पाटील यांच्या १५ वर्षांच्या मंत्रीपदाच्या काळात शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळून विकासाची अनेकविध कामे मार्गी लागली आहेत. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा शहराचा शाश्वत विकास करण्याला आमचे प्राधान्य राहील. विजयभाऊ पाटील म्हणाले, येत्या पाच वर्षात गुंठेवारीतील सर्व रस्ते डांबरीकरण आणि पेव्हिंग ब्लॉकने अद्ययावत करु. मंत्री तलावाचे सुशोभिकरण लवकरच पूर्ण करू. शहराची ६८ कोटी ८७ लाख रुपयांची भुयारी गटार योजना सप्टेंबर १४ मध्ये मंजूर केल्याचे पत्र तत्कालीन केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांनी पाठवले आहे. योजनाच मंजूर नाही, हा विरोधकांचा आरोप तद्दन खोटा आहे. गुंठेवारी नियमितीकरणास उशीर होत असल्याच्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आरोपाचा समाचार घेताना विजयभाऊ पाटील म्हणाले, सदाभाऊंच्या जागेचे नियमितीकरण दोन दिवसात करुन दिले आहे. त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या बंगला उभारणीसाठी असलेली तांत्रिक अडचणही आम्हीच दूर करुन दिली आहे. बी. ए. पाटील म्हणाले, येत्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीवेळीही शहरातील नागरिकांवर करवाढ लादू देणार नाही. कर अपील समितीसमोर सत्ताधारी गटातर्फे शहरातील नागरिकांची अभ्यासूपणे आणि सक्षमतेने बाजू मांडली जाईल. खुल्या वर्गातील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांचे प्रस्ताव तयार करुन त्यांनाही घरकुल योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरु आहे. अॅड. चिमण डांगे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळालेली भुयारी गटार योजना, २४ बाय ७ पाणी योजना राज्यातील विद्यमान युती शासनाने निधी न दिल्याने रखडल्या आहेत. भविष्यात या योजना पूर्ण करणारच. यावेळी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, शहाजी पाटील, सुरेंद्र पाटील, रोझा किणीकर, संपतराव पाटील, वसंतराव कुंभार, शंकरराव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा विकास, भुयारी गटार, २४ तास पाणी योजना, सांडपाण्यावर आधारित वीज निर्मिती, घनकचरा, बायोगॅस व वीज निर्मिती, अद्ययावत रस्ते, प्रेरणा अभियान, महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा, शहरात १२ उद्यानांची उभारणी, मागासवर्गीय मुला—मुलींसाठी वसतिगृह यासह इतर मुद्यांचा समावेश आहे.
इस्लामपूर आदर्श बनविण्याचा निर्धार
By admin | Updated: November 17, 2016 23:02 IST