खानापूर : खानापूर येथे सुरू असलेली डेंग्यूसदृश साथ आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उपाययोजना म्हणून संपूर्ण शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत आहे.
गेल्या तीन-चार आठवड्यांपासून खानापूर येथे डेंग्यूसदृश साथ सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण कमी, पण डेंग्यूचे रुग्ण जादा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी साचून राहिलेले सांडपाणी, दलदल, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी खानापूर नगरपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायतीने संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम, जनजागृतीबरोबर डास प्रतिबंधक औषध फवारणी सुरू केली आहे.
खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जनजागृतीबरोबर आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. थंडी व ताप असलेल्या रुग्णांनी तत्काळ आरोग्य तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.