ओळ : येळापूर (ता. शिराळा) येथे जिल्हा बँक व आपला बझारची शाखा सुरु करावी. याचे निवेदन रेश्मा पाटील यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांना दिले. यावेळी जया पाटील, कविता पाटील, सुनंदा पवार, सजाबाई आटुगडे उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : येळापूर (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सुरु करावी. तसेच महिला बचत गटास आपला बझारची शाखा चालविण्यासाठी द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा दीपक पाटील यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे केली.
येळापूर गाव विस्ताराने मोठे असून येथील बारा वाडी-वस्ती आणि मेणी खोऱ्यातील चार गावे व वाड्या तसेच पाचगणी, मानेवाडी, हत्तेगाव येथील लोकांचा शासकीय, खासगी विविध कामानिमित्त येळापूरला संपर्क असतो. त्यातच माध्यमिक विद्यालयासह सर्व प्रमुख शासकीय कार्यालये आहेत. दोन पतसंस्था, तीन सेवा सोसायटी, गणेश पाणी पुरवठा योजनेमुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली आली असल्याने जिल्हा बँकेची शाखा येळापूरला करण्यात यावी. सध्या शेडगेवाडी येथे असणाऱ्या शाखेवर कामाचा मोठा ताण आहे. त्यातच ही बँकेची शाखा मूळची येळापूरची आहे. मात्र स्थानिक राजकारणातून ती परत शेडगेवाडी फाटा येथे गेली आहे. येळापूरसह परिसरात महिलांचे मोठे आणि चांगले बचत गट सुरु असल्याने आपला बझारची छोटी शाखा येळापूर येथे सुरु करुन ती बचत गटास चालविण्यासाठी द्यावी. यामुळे महिलांच्या हाती काम मिळेल तसेच महिलांनी बनवलेल्या अनेक वस्तू येथे विक्रीसाठी ठेवण्यात येथील. बझारसाठी गावात योग्य जागा उपलब्ध असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होईल. त्यातच येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाल्याने याचाही फायदा होऊ शकतो. तरी येळापूर येथे जिल्हा बँक व आपला बझार शाखा सुरु करावी, अशी मागणी बचत गटाच्या वतीने आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे केली आहे.