सांगली : शिवोदय नगर येथील रस्त्याचे काम पूर्ण क्षमतेने करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
येथील बाळूमामा मंदिरापासून पश्चिमेला जाणाऱ्या १५ मीटर रस्त्यावर ड्रेनेजचे काम पूर्ण केल्यानंतर तो पूर्ववत करताना ६ मीटरने करण्यात येत आहे. याठिकाणी मुरुमीकरण व खडीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असले तरी नागरिकांनी हा रस्ता पूर्ण क्षमतेने केल्यास त्याचा फायदा होणार आहे. येथील नागरिक विश्वासराव भोसले यांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार केली आहे. कमी क्षमतेने रस्त्याचे काम केल्यास वाहतुकीला अडथळे निर्माण होणार आहेत. नागरिकांना त्यांची चारचाकी वाहने नेताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याप्रश्नी लक्ष घालून हा रस्ता पूर्ण क्षमतेने करावा, अशी मागणी केली आहे. गेल्या आठवडाभरात चिखलमय रस्त्यावर पडून चार नागरिक जखमी झाले आहेत. रस्त्याचे काम पूर्ण क्षमतेने न झाल्यास असे किरकोळ अपघात वाढणार आहेत. या प्रश्नाची दखल न घेतल्यास येथील नागरिकांसह आंदोलन करण्याचा इशारा भोसले यांनी दिला आहे.