कोकरुड : पडवळवाडी (वाकुर्डे, ता. शिराळा) येथील करमजाई धरण ओढ्यावरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यातून धरणाचे पाणी वाहत असल्याने येथील नागरिकांना तीन किलोमीटरवरील बादेवादी येथून चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने वाकुर्डेपैकी पडवळवाडी येथील करमजाई धरण पूर्ण क्षमतेचे भरले आहे. अतिरिक्त पाणी वाकुर्डे ओढ्यात जाऊन पडवळवाडीला जाणाऱ्या पुलावरून वाहत होते. यामुळे हा पूल वाहून गेला आहे. ओढ्याच्या शेजारची शेतीही वाहून गेली आहे. शनिवारपासून पावसाने उघडीप दिली असतानाही या ओढ्यात करमजाई धरणाचे पाणी वाहत असल्याने येथील नागरिकांना तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बादेवाडीमार्गे चिखल तुडवत दूध, चारा, किराणा साहित्य खरेदीसाठी ये-जा करावी लागत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत असल्याने बांधकाम विभागाने तातडीने पूल बांधावा, अशी मागणी सचिन पडवळ, आनंद पडवळ यांनी केली आहे.