विटा : महाराष्ट्रातील यंत्रमाग लघुउद्योगाचे दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने राज्यातील यंत्रमाग उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्यातील यंत्रमाग लघुउद्योगांना राज्य सरकारने वीज दर अनुदान देण्याचे बंद केल्याने यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यातील यंत्रमाग लघुउद्योगांचे वीज दर किमान तीन वर्षासाठी स्थिर ठेवावेत, असे साकडे विटा येथील यंत्रमागधारकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असल्याची माहिती विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी गुरुवारी दिली. देशातील सुमारे २० लाख यंत्रमागांपैकी एकट्या महाराष्ट्रात १२ लाख यंत्रमाग आहेत. राज्य सरकारने वीज दर अनुदान देण्याचे बंद केल्यामुळे राज्यातील सर्व उद्योग, यंत्रमाग व ३०० युनिटच्या आतील घरगुती वीज ग्राहकांच्या वीज बिलात सरासरी २२ ते २३ टक्के दरवाढ झाली आहे. यंत्रमाग लघुउद्योगाच्या सवलतीच्या दरातील वाढ सर्वाधिक आहे. २७ अश्वशक्तीच्या आतील ग्राहकांच्या दरात २५ टक्के, तर त्यापुढील ग्राहकांच्या दरात ५० टक्के वीज दरवाढ केली आहे. त्याशिवाय महावितरणने पुन्हा १२ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे यंत्रमाग लघुउद्योगाला वीज दरवाढीचा मोठा फटका बसणार असून यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडणार आहे.त्या पार्श्वभूमीवर वीज क्षेत्रातील सर्व पातळीवरील चोऱ्या व भ्रष्टाचाराला आळा घालावा आणि यंत्रमाग लघुउद्योगाचे वीज दर किमान ३ वर्षासाठी स्थिर ठेवून यंत्रमाग व्यवसायाला दिलासा द्यावा, अशी मागणी विट्यातील यंत्रमागधारकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचेही तारळेकर यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)
यंत्रमाग लघुउद्योगाचे वीज दर स्थिर ठेवण्याची मागणी
By admin | Updated: February 6, 2015 00:44 IST