सांगली : जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करू नये आणि सध्याची दुकाने बंद करण्याची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी भाजपच्या व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चिपळूणकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना निर्बंधांमुळे सध्या रात्री आठ वाजताच दुकाने व अन्य व्यवसाय बंद केले जात आहेत. रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत जमावबंदी समर्थनीय नाही. कोरोना व महापुरामुळे गेल्या दोन वर्षांत सांगलीचे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. रात्री आठ वाजता व्यवसाय बंद ठेवण्याने व्यापारी संकटात सापडले आहेत. कोरोना नियंत्रणसाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे लाॅकडाऊन टाळावे व बाजारपेठेला ऊर्जितावस्था द्यावी. दुकानांना रात्री दहापर्यंतची वेळ द्यावी.
निवेदनावर संदीप ताटे, किरण मोहिते, सागर सूर्यवंशी, राहुल चैागुले, अभिजित शिंदे यांच्याही सह्या आहेत.