सांगलीत समुदाय आरोग्याधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. गणेश शेळके या समुदाय आरोग्याधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी करण्यात आली. राज्यव्यापी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेमार्फत शनिवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विनायक पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अमितकुमार सूर्यवंशी, सचिव डॉ. विश्वनाथ पाटील, विजय लोखंडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळूनच डॉ. शेळके यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना काळात राज्यभरातील कोविड रुग्णालयांत जीव धोक्यात घालून आम्ही काम करत आहोत. गेल्या दीड वर्षापासून विश्रांती घेतलेली नाही. या स्थितीत वरिष्ठांनी सहकार्य करण्याऐवजी मानसिक त्रास देणे निषेधार्ह आहे. डॉ. शेळके यांना त्रास देणाऱ्या वरिष्ठांवर कारवाई झाली नाही तर राज्यभरातील समुदाय आरोग्याधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होईल. त्यामुळे शासनाने डॉ. शेळके यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.