सांगली : कोरोनामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला आहे. बेकरीतील तयार पदार्थाला प्राधान्य देणाऱ्या गृहिणी सध्या मुलांना घरातच ते पदार्थ तयार करून देत आहेत. कडधान्य, फळे आणि पालभाज्या आहारात वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आहाराला बहुतांशी नागरिक प्राधान्य देताना दिसत आहेत.
आहाराबाबत प्रत्येक कुटुंब जागृत झाले आहे. ग्रामीण भागामध्ये जागृती नसली तरी शहरी भागामध्ये उत्तम आहाराला नागरिक प्राधान्य देताना दिसत आहेत. संतुलित आहाराचे सेवन करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे, असेही नागरिक सांगत आहेत. धान्य व तृणधान्य म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, मका, यासह डाळी यांचा आहारात समावेश असणे गरजेचे असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाच्या साथीमुळे नागरिकांनी आपली जीवनशैलीच बदलली आहे. फास्ट फूडला प्राधान्य देणारेही नागरिक सध्या घरातील जेवण, फळे आणि कडधान्य खाण्याला प्राधान्य देत आहेत. बेकरीतील पदार्थ खरेदी करण्याकडे कुटुंबीयांनी बंद करून समोसे, केक, बटाटावड्यासह बहुतांशी पदार्थ नागरिक घरीच बनवत असल्याचे महिलांनी सांगितले.
चौकट
बेकरी पदार्थांना अघोषित सुटी
कोरोनाच्या संकटात आजारी पडू नये, यालाच सर्वच कुटुंबीय प्राधान्य देत आहेत. यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या आहारातून बेकरी पदार्थांना काही दिवसासाठी तरी सुटी दिल्याचे नागरिकांनी सांगितले. बेकरीमधून आणावे लागणारे पदार्थ मुलांना घरीच बनविण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत, असेही काही महिलांनी सांगितले.
कोट
कोरोनामध्ये आम्ही शाकाहाराला प्राधान्य देत आहे. जेवढा लागेल तेवढाच स्वयंपाक केला जातो. नाश्त्यामध्ये तेलकट पदार्थ टाळत असून कुठलेही एक फळ आहारात असतेच. भिजवलेल्या कडधान्याचा वापरही वाढविला आहे.
-संगीता पाटील, गृहिणी.
कोट
आहारात तेलकट पदार्थ कमी केले आहेत. भरपूर फळे आणि भाजीपाल्यांचा वापर केला जातो. घरातील लहान मुलांसह आम्ही रोज तुळशीची पाने घालून चहा घेतो. मुलांना दूध देताना हळद घातली जाते. यामुळे मुलांचे आरोग्य उत्तम आहे.
-मनीषा जाधव, गृहिणी
कोट
कडधान्ये, पालेभाज्यांना आम्ही जास्त प्राधान्य देतो. गेल्या दीड वर्षापासून बेकरी पदार्थ पूर्णत: बंद केले आहेत. मुलांच्या आवडीचे पदार्थ आम्ही घरातच करून त्यांची गरज पूर्ण करतो.
अश्विनी जोशी, गृहिणी.
चौकट
आहारात आवळा, संत्री, सफरचंद हवेच
रोजच्या आहारात अनेक कुटुंबीय आवळा, आवळा कँडी, संत्री, मोसंबी आणि सफरचंदाला प्राधान्य देत आहेत. प्रत्येकाचा हलक्या नाश्त्याबरोबर फळे खाण्याकडेही मोठ्या प्रमाणात कल दिसत आहे. आहाराबाबत नागरिकांमध्ये जागृती झाल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे.