सांगली : जिल्ह्यातील विविध आस्थापना, रुग्णालये, हाॅटेल्सवरील कन्नड भाषेतील फलक तातडीने हटवावेत, अन्यथा मनसे स्टाइलने फलक काढले जातील, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शुक्रवारी दिला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सावंत म्हणाले की, कर्नाटकात मराठी भाषेचा अपमान व गळचेपी होत आहे. मराठी भाषा व मराठी माणसाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी आग्रही असते. कर्नाटकात अनेक मराठी भाषिक राहत आहेत. मराठी शाळा आहेत. मराठी लोकांवर तेथील भाजप सरकार दबाव टाकत आहे. काही जिल्ह्यांतील मराठी शाळा बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातील एसटी बसवर हल्ला करून नामफलकाला काळे फासले जात आहे. सांगली, सोलापूर कर्नाटकात सामील करणार, असेही वक्तव्य केले जात आहे. याचा मनसेच्या वतीने आम्ही निषेध करतो. या साऱ्या गोष्टी घडत असताना बेळगाव महाराष्ट्रात आणणारे मुख्यमंत्री मात्र मूग गिळून गप्प आहेत.
कर्नाटकातील मराठी माणसावर व भाषेवर अन्याय झाला तर मनसे गप्प बसणार नाही. महापालिका क्षेत्रासह सीमाभागातील कन्नड शाळा आम्हीही बंद करू. जिल्ह्यातील आस्थापना, हॉटेल्स, हॉस्पिटलवर असलेले कन्नड व इतर भाषांतील बोर्ड, फलक प्रशासनाने येत्या आठ दिवसांत काढून टाकावे, अन्यथा मनसे स्टाइलने ते काढले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.