तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथे भटक्या समाजातील जगनू पवारचा संसार काही समाजद्वेषींनी जाळून राख केला. याबाबचा ‘ऑन दि स्पॉट रिपोर्ट’ मंगळवारी ‘लोकमत’मधून मांडण्यात आला. या घटनेचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. जगनूच्या चित्तरकथेने माणुसकीला गहिवर फुटला असून अनेक व्यक्ती, संस्थांनी जगनूचा संसार सावरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
फासेपारधी समाजातील जगनू पवार त्याच्या कुटुंबीयांसह सावर्डे येथे वनविभागाच्या जागेत झोपडीत राहत होता. मात्र गावातील काही विकृत सामाजिक प्रवृत्तींनी त्याचे कुटुंबीय परगावी गेल्याचे पाहून संसार साहित्यासह पूर्ण झोपडीच जाळून टाकली. या घटनेने त्याच्या संसार आणि स्वप्नांची राख झाली.
याबाबत ‘लोकमत’मधून विदारक वास्तव निदर्शनास आल्यानंतर, समाजाच्या सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. प्रवाहाबाहेर असणाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही सामाजिक संघटनांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून दिली.
जगनूच्या संसाराला पुन्हा फुलवण्यासाठी लागेल ती सर्व मदत करण्याची ग्वाही अनेकांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी जीवनावश्यक साहित्यांची मदत केली. आरपीआयचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदेश भंडारे, तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे यांनी पवार कुटुंबाला घर बांधून देणार असल्याची ग्वाही दिली आहे. वज्रचौंंडे येथील सामाजिक संस्थेने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’च्या माध्यमातून दहा हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जगनूच्या आयुष्याची परवड पाहून, त्यांचा संसार सावरण्यासाठी संवेदनशील समाजाला फुटलेला माणुसकीचा गहिवर नक्कीच त्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देईल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.
चौकट :
नेत्यांचे मौन
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तासगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जगनूच्या संसाराची राख झाली तरी मौन धारण करून बसले आहेत. फासेपारधी समाजातील सुमारे चाळीस ते पन्नास मतदार अनेक वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावत आहेत. निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधी झोपडीपर्यंत जात असतात. मात्र अद्यापपर्यंत त्यांना त्यांचा मूलभूत हक्क मिळू शकलेला नाही. झोपडी जळाल्यानंतर विचारपूस करण्याची तसदीदेखील आमदार, खासदारांसह अनेक लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.
कोट
जगनू पवारला राहण्यासाठी मी स्वत:चे शेड उपलब्ध करून दिले होते. सावर्डेत वन विभागाच्या जागेवर शासकीय नियमानुसार भटक्या समाजाला प्रशासनाकडून जागा मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.
प्रदीप माने-पाटील, सरपंच सावर्डे, ता. तासगाव, तालुका प्रमुख शिवसेना