देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरात हळदीचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे. पण यंदा अतिवृष्टी, अवकाळी पावसाबरोबरच बदलत्या हवामानाचा फटका हळद उत्पादकांना बसला आहे. परिसरातील हळद उत्पादनात अंदाजे ४० टक्के घट होईल, असा अंदाज हळद उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
सोनहिरा परिसरात ताकारी योजनेचे पाणी आल्याने येथील शेतकरी मोठया प्रमाणात बागायती शेती करू लागला. ऊस पिकाबरोबर हळद, आले ही पिकेही घेतली जात आहेत. मोहिते वडगाव, देवराष्ट्रे, चिंचणी, अंबक, आसद, रामापूर, शिरगाव, सोनकिरे या गावात हळद पिकाचे चांगले उत्पादन घेतले जाते. पण यंदा हळद पिकास पावसाचा मोठा फटका बसला आहे.
ऑगस्ट महिन्यात व नंतर अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली, तर ज्या शेतात पाणी साचले तेथील हळद पीक नष्ट झाले. अतिवृष्टीतून वाचून कशीबशी पिके सुधारतात तोपर्यंत अवकाळीचा पुन्हा फटका बसला. त्यामुळे हळदीसह आले पिकाला मोठा फटका बसला आहे.
चौकट
नुकसानीची भरपाई नाही
मोहिते वडगाव येथील शेतकरी विनोद मोहिते म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून मी हळद पीक घेत आहे; पण यावर्षी पावसाचा मोठा फटका हळद पिकास बसला. हळदीचा गड्डा मोठयाप्रमाणात पोसवला गेलेला नाही. त्यामुळे उत्पादनात चाळीस टक्के घट होईल. दर्जेदार हळद ही पाहावयास मिळणार नाही. नुकसानीचे पंचनामे केले, पण त्याची भरपाई मिळाली नाही.