इस्लामपूर : ठाणापुडे (ता. वाळवा) पंचक्रोशीत गवंडीकाम करणाऱ्या शहाजी पाटील यांची कन्या शिवानी हिने केंद्रीय पोलीस दलात भरती होण्यात यश मिळवले अन् साऱ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन तिचा आई-वडिलांसह फेटा बांधून सत्कार केला. निरक्षर आई-वडील आपल्या मुलीचा कौतुक सोहळा पाहताना भावूक झाले.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय पोलीस दलात निवड झालेल्या शिवानी शहाजी पाटील हिचा ठाणापुडे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. वर्षाराणी विनोद मोहिते यांच्या हस्ते शिवानीला गौरविण्यात आले. राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
वाळवा आणि शिराळा तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या ठाणापुडे या छोट्याशा गावात गवंडीकाम करणाऱ्या शहाजी व सुनंदा पाटील यांची शिवानी ही एकुलती एक कन्या. घरात मुलगा गतिमंद अवस्थेत असताना त्याला सांभाळत मुलीला शिक्षणात प्रोत्साहन दिले. शिक्षणासाठी आई-वडिलांनी केलेल्या परिश्रमांमुळे हे शक्य झाले, हे सांगताना शिवानीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले.
आई-वडील दोघंही निरक्षर, भाऊ गतिमंद अवस्थेत असताना कौटुंबिक अडचणींवर मात करून शिक्षणाच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करताना शिवानीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याची भावना मोहिते यांनी व्यक्त केली. तुषार पाटील यांनी स्वागत केले. आदित्य पाटील यांनी आभार मानले. ज्ञानदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपसरपंच रमेश गुरव, बाळासाहेब पाटील, निवास पाटील, उत्तम जाधव, कल्पना पाटील, सविता पाटील, वर्षा पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
जिद्दीने मिळवले यश
शिवानीने माध्यमिक शिक्षण देववाडी; तर महाविद्यालयीन शिक्षण इस्लामपुरातील के. आर. पी. महाविद्यालयात घेतले. तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. पोलीस दलात जाऊन संरक्षण क्षेत्रात नाव कमावण्याची जिद्द असणाऱ्या शिवानीने सुरुवातीला गावात राहूनच अभ्यास केला. नंतर करियर अकॅडमीत प्रवेश घेतला. स्वतःच्या हिमतीवर आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यावर तिने हे यश मिळवले.
फोटो-०६शिवानी पाटील