सांगली : येथील वसंतदादा पाटील साखर कारखाना चालवित असलेल्या दत्त इंडिया कंपनीने मागील गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांना अद्याप दिलेली नाहीत. दुसऱ्या हप्त्याचे ३४ कोटी रुपये शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह आठ दिवसांत द्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘आंदोलन अंकुश’च्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्यूंजय शिंदे यांना दिले.
शासनाच्या आदेशानुसार शुगर केन कंट्रोल कायदा १९६६ नुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसांत शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी देणे बंधनकारक आहे. चौदा दिवसांत शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली नाही, तर थकीत रकमेवर १४ टक्के व्याजासह ते द्यावे, असा कायदा आहे. तरीही दत्त इंडिया कारखान्याने दोन हजार ८८८ रुपये एफआरपी असतानाही त्यांनी शेतकऱ्यांना केवळ दोन हजार ५०० रुपये दिले आहेत. उर्वरित ३८८ रुपये शेतकऱ्यांना दिले नाहीत. शेतकऱ्यांचे ३४ कोटी रुपये दत्त इंडियाकडे थकीत असूनही त्यांनी दिले नाहीत. याबाबत आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, अविनाश पाटील, दिलीप माने, अमोल माने, अमोल गावे, आप्पा कदम यांनी मंगळवारी दत्त इंडियाचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. दत्त इंडियाने आठ दिवसांत ३४ कोटी रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना दिले नाही, तर कारखान्याच्या प्रवेशद्वारात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही चुडमुंगे यांनी दिला आहे.