कोकरुड : गवळेवाडी (ता. शिराळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या दत्तात्रय बाळकृष्ण हाप्पे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच कृष्णा ऊर्फ बाबा गोळे अध्यक्षस्थानी होते. निवडीनंतर हाप्पे समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके उडवत गुलालाची उधळण केली. साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासह सर्व सदस्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या होत्या. लोकनियुक्त सरपंचपदी राष्ट्रवादीचे बाबा गोळे तर उपसरपंचपदी भाजपच्या विलास गवळी यांची निवड करण्यात आली होती. मात्र उपसरपंचपद आणखी काही सदस्यांना देण्याचे ठरले होते. त्यातच आणखी कालावधी मिळावा म्हणून उपसरपंच विलास गवळी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र राष्ट्रवादीसह भाजपच्या सदस्यांनी राजीनामे दिल्याने अखेर युवा नेते सुरेश चिंचोलकर यांनी हस्तक्षेप करून सर्व सदस्यांना राजीनामे परत घेऊन तोडगा काढला. ठरल्याप्रमाणे विलास गवळी यांनी राजीनामा दिल्याने मंगळवारी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये दत्ता हाप्पे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन उपसरपंच दत्ता हाप्पे यांचा सत्कार प्रचिती दूध संघाचे संचालक युवा नेते सुरेश चिंचोलकर (आप्पा) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच बाबा गोळे मावळते उपसरपंच विलास गवळी, विष्णू खटाटे शोभा कुंभार, सविता काब्दुले, माजी सरपंच शिवाजी हाप्पे, जालिंदर हाप्पे, आदिक हाप्पे, तानाजी हाप्पे, सुरेश कांबळे, सुभाष काब्दुले, प्रताप हाप्पे, प्रकाश शेवाळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
फाेटाे : १९ दत्ता हाप्पे