सांगली : भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत केंद्रस्थानी आल्यापासून देशभरातील धर्मांध शक्तींचा उद्रेक वाढत चालला आहे. यामुळे भविष्यात विवेकवादी विचारसरणीचा आवाज संपविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत डॉ. मेघा पानसरे यांनी सोमवारी व्यक्त केले. बहुजन हिताय शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे आयोजित केलेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ‘पुरोगामी कार्यकर्त्यांपुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. डॉ. पानसरे म्हणाल्या, गोविंदराव पानसरे यांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांची पुरोगामी बैठक पक्की करण्याचे कार्य केले होते. परंतु त्यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांचा खून करण्यात आला. पुरोगामी नेत्यांचे काहींशी वाद होते. कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या टोल आंदोलनात पानसरे अग्रभागी होते. कोणालाही न घाबरता त्यांनी वाढत्या धर्मांध शक्तींविरोधात उभे राहण्याचे धाडस दाखविले होते. शंकराचार्य यांनी चातुर्वर्णाचा पुरस्कार केला होता. त्यांचा कोल्हापूर येथील कार्यक्रम पानसरे यांच्या प्रखर विरोधामुळे रहित करावा लागला होता. त्यांचा कर्मकांडांना विरोध होता. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांचे हल्लेखोर मोकाट फिरत असतील, तर भविष्यातही पुरोगामी विचारांच्या व्यक्तींच्या हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुनर्जन्म, पाप-पुण्य याबाबत भ्रामक प्रचार सुरु असून त्याविरोधात समतेचा विचार समाजमनात रुजविण्याचे आव्हान आपल्यापुढे असल्याचेही डॉ. पानसरे यांनी सांगितले.शिबिराचे उद्घाटन माजी न्यायाधीश सी. एल. थूल यांनी केले. यावेळी त्यांनी बहुजन विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचे आवाहन केले. राजाभाऊ पद्माळकर, अॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भविष्यात विवेकवादाचा आवाज संपविण्याचा धोका
By admin | Updated: May 20, 2015 00:08 IST