शिराळा : येथील औद्योगिक वसाहत आणि भटवाडी, औढी, करमाळे, पणुब्रे तर्फ शिराळा येथे दि. ५ जून रोजी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने नुकसान झाले. याचे पंचनामे पूर्ण झाले असून, तब्बल ४ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले की, दि. ५ जून रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शिराळा व शिरशी मंडळामध्ये नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीतील ४ उद्योग संस्थेच्या इमारती पूर्णतः बाधित झाल्या असून, त्यांचे २ कोटी १३ लाख २५ हजार ६२०, तर अंशतः १५ इमारतींचे २ कोटी ४७ लाख ८७ हजार ८२ असे एकूण ४ कोटी ६१ लाख १२ हजार ७०२ रुपयांचे नुकसान झाले आहे.
औद्योगिक वसाहतमधील पत्रे उडून जवळपास राहणाऱ्या औढी व भटवाडी येथील घरांवर पडल्याने व वादळी पावसामुळे ८ पूर्णतः व ७६ अंशतः घरांचे ७ लाख ७६ हजार ४०० रुपयांचे, तर घरांमध्ये पाणी गेल्याने १६ घरे बाधित होऊन ५ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर ५ महिला जखमी झाल्या आहेत. यामध्ये एका महिलेचे दोन्ही पाय, तर एका महिलेचा एक पाय मोडला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बाधित कुटुंबांना नुकसान भरपाईपोटी १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळावे अशी मागणी केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी नायब तहसीलदार सचिन कोकाटे, नायब तहसीलदार व्ही. डी. महाजन, राजू खैरे, सुनील कानडे, शंभू कन्हेरे उपस्थित होते.