मिरज : गृहरक्षक दलात बारा वर्षे पूर्ण झालेल्यांना सेवानिवृत्त करण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध म्हणून गृहरक्षक जवानांनी सण, उत्सवाच्या बंदोबस्तावर बहिष्कार घातला आहे. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गृहरक्षक जवानांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे ईद सणासाठी बंदोबस्त पार पाडताना पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने गृहरक्षक जवानांच्या मदतीने बंदोबस्त पार पाडण्यात येतो. मिरजेसारख्या संवेदनशील ठिकाणी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर गृहरक्षक दलाचे जवान पोलिसांसोबत बंदोबस्ताचे काम पार पाडतात. बंदोबस्तासाठी गृहरक्षक जवानांना प्रति दिवशी केवळ ४५० रूपये भत्ता मिळतो. गृहरक्षक दलात काम करणाऱ्यांना पोलिस भरतीत पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र आता गृह विभागाने, बारा वर्षे सेवा झालेल्या गृहरक्षक जवानांना निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १८ ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्ती गृहरक्षक दलात काम करीत होत्या. मात्र नवीन निर्णयाप्रमाणे, बारा वर्षानंतर अनुभवी गृहरक्षक जवानांना घरी पाठविण्यात येणार आहे. गृह विभागाच्या निर्णयास गृहरक्षक जवानांनी व अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, पोलिसांसोबत सण, उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांच्या बंदोबस्तावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. सण, उत्सवावेळी धार्मिक स्थळांभोवती गृहरक्षक दलाचा चोवीस तास बंदोबस्त ठेवण्यात येतो. गृहरक्षक दलाच्या जवानांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, १२ वर्षे सेवेचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. पोलिसांप्रमाणेच कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या गृहरक्षक जवानांना वाऱ्यावर सोडण्याच्या या निर्णयामुळे गृहरक्षक जवानांनी बंदोबस्तावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मिरजेत ईदच्या बंदोबस्तासाठी गृहरक्षक दलाच्या ५० जवानांची मागणी पोलिसांनी केली आहे. मात्र बंदोबस्तासाठी कोणीही हजर झालेले नाही. ऐन सणाच्यावेळी गृहरक्षक दलाच्या माघारीमुळे पोलिसांची धावपळ होणार आहे. (वार्ताहर) दहा वर्षांत निधी खर्चाकडे दुर्लक्ष, तरीही कारवाई नाही शासनाने गृहरक्षक जवानांवर अन्याय केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४५० गृहरक्षक बेरोजगार होणार आहेत. हा निर्णय रद्द केला नाही, तर यापुढे गणेशोत्सवासह सर्व सण, उत्सवांच्या बंदोबस्तावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले.
गृहरक्षक दलाचा बंदोबस्तावर बहिष्कार
By admin | Updated: July 7, 2016 00:21 IST