लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग कधी वाढतो, तर कधी कमी होतो. त्यात शहराची घनता जास्त असतानाही लसीचा अपेक्षित पुरवठा होत नाही. सध्याच्या वेगाने लसीच्या पहिल्या डोससाठी सहा ते आठ महिने, तर दुसऱ्या डोससह पूर्ण लसीकरणासाठी वर्षभरापेक्षा अधिकचा कालावधी लागू शकतो. त्यात आता दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात आल्ने यापहिल्या डोससाठीची प्रतीक्षा लांबणार आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रात ३७ टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे. अजून दोन लाख लाभार्थी लसीसाठी वेटिंगवर आहेत.
महापालिका क्षेत्रात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेने १४ केंद्रांत लसीकरणाची सोय केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी मात्र लस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला. त्यात शासनाने ६० वर्षांपुढील, ४५ ते ५९, १८ ते ४४ अशी वर्गवारी केली. एप्रिल, मे महिन्यात लसीकरणाचा वेग खूप कमी होता. जून महिन्यात लसीकरणाने थोडा वेग घेतला, पण लसीचा पुरवठा अनियमित होत असल्याने त्यातही अडथळे येत आहेत. दोन दिवस लस उपलब्ध असते, तर पुढचे दोन दिवस लसच नसते, अशी स्थिती आहे. त्यामुळे सध्याच्या वेगाने महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दोन्ही डोस मिळण्यास वर्षभराचा कालावधी जाईल, अशीच शक्यता आहे.
महापालिका क्षेत्रात सर्व वयोगटातील ३ लाख ३१ हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी १ लाख २४ हजार ५३६ नागरिकांना पहिला डोस, तर ४३ हजार ६४५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सध्या ३७.६० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. ६० वर्षावरील नागरिकांचे सर्वाधिक ६० टक्के लसीकरण झाले आहे. त्याखालोखाल ४५ ते ५९ वयोगटातील ५५ टक्के, तर सर्वात कमी १८ वर्षावरील ९ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. अजून २ लाख ६ हजार नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे.
चौकट
महापालिका क्षेत्रातील लसीकरणाची स्थिती...
वयोगट लाभार्थी लसीकरण टक्केवारी
१८ ते ४४ १,६२,९५४ १५००० ९.२०
४५ ते ५९ ८३३३६ ४५५०८ ५४.६०
६० वरील ६५ ६०७ ३९६४३ ६०.४२
हेल्थवर्कर १४४३० १४४०७ ९९.८४
फ्रंटलाईन वर्कर ४८५८ ९९३९ २०४.५९
चौकट
दुसऱ्या डोसला प्राधान्य
गेल्या आठवड्यापासून प्रशासनाने दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले आहे. सध्या ७० टक्के लसी या दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवल्या जात आहेत. त्यानंतर उर्वरित ४५ ते ५९ व १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. त्यामुळे पहिल्या डोससाठी नागरिकांना बरीच प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.