दत्ता पाटील -तासगाव -तासगाव शहराची स्वच्छता करण्यासाठी नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी अपुरे पडू लागले. स्वच्छतेचा प्रश्न भेडसावू लागला. यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन कारभाऱ्यांनी स्वच्छतेचा ठेका देण्यास सुरुवात केली. काही वर्षे ठेकेदार कंपनीकडून चांगले काम झाले. अलीकडील काळात मात्र तासगावच्या अनेक रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. लाखो रुपयांचा चुराडा होऊनही स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. तासगाव शहराच्या विस्तारिकरणाचा आणि लोकसंख्येचा वेग वाढत आहे. त्यामुळे साहजिकच कचऱ्याची समस्याही मोठ्या प्रमाणात शहराला भेडसावत आहे. २००७ पूर्वी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरातील स्वच्छतेचे काम केले जात होते. या विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली नाही. साहजिकच स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला. यावर तोडगा काढण्यासाठी नगरपालिकेच्या तत्कालीन कारभाऱ्यांकडून स्वच्छतेचा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला. २००७ मध्ये पाच वर्षांसाठी स्वच्छतेचा ठेका देण्यात आला. त्यानंतर पुन्हा स्वच्छतेचा ठेका देण्यासाठी निविदा मागणविण्यात आल्या. पहिल्यांदा पाच वर्षे काम केलेल्या बीव्हीजी इंडिया कंपनीचीच दुसऱ्यांदा निविदा मंजूर झाली. पाच वर्षांसाठी ही निविदा मंजूर करण्यात आली. १६ सप्टेंबर २०१४ पासून प्रत्यक्षात कंपनीकडून कामाला सुरुवात करण्यात आली.कंपनीने कामाचा सलग दुसऱ्यांदा ठेका घेतला खरा, प्रत्यक्षात शहरातील बहुतांश भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नियमित येणारी घंटागाडी तीन-चार दिवसांतून एकदाच येते. गटारीतील कचरा रस्त्यावर काढला जातो, परंतु तो उचलला जात नाही. मुख्य रस्ते सोडल्यास अनेक अंतर्गत आणि विस्तारित रस्त्यालगतच्या गटारी तुंबलेल्या असतात. रस्त्यावर असलेल्या दुर्गंधीच्या साम्राज्यामुळे शहरात डासांचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. स्वच्छतेच्या ठेक्यासाठी वर्षाला ७० लाखांचा खर्च होत आहे. मात्र नागरिकाची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मात्र याचे फलित काहीच नसल्याचे दिसून येत आहे.असा आहे ठेका... पहिल्यावर्षीचे काम समाधानकारक वाटल्यास, त्यानंतर ठेक्यास जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय. प्रत्येकवर्षी दहा टक्के दरवाढ. सद्यस्थितीत स्वच्छतेच्या ठेक्यासाठी महिन्याला ५ लाख ८१ हजार १३७ रुपये खर्च.वर्षाला ठेक्यासाठी तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ७० लाखांचा खर्च.
लाखो रुपयांचा चुराडा, तरीही स्वच्छतेचा बोजवारा
By admin | Updated: May 22, 2015 00:09 IST