शिराळा : येथील मोरणा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात ४ ते ५ मोठ्या मगरींचे वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या मगरी गेल्यावर्षी पुराच्या पाण्यामधून आल्या असाव्यात, असा अंदाज आहे. शेतीच्या पाण्यासाठी परिसरातील शेतकरी मोरणेवर अवलंबून आहेत. मोटर दुरुस्ती, पाईपलाईन, मोटरची केबल यासाठी अनेकदा त्यांना पाण्यात उतरावे लागते. अनेकजण येथे मासेमारीसाठी येत असतात. परिसरातील तरुण, अबालवृध्द पोहण्यासाठी पाण्यात उतरत असतात. चरण्यास आणलेली जनावरे पाणी पाजण्यासाठी थेट तलावावर आणली जातात. मगरींच्या खुलेआम वावरामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. बऱ्याचदा या मगरींनी पाण्यालगत असणाऱ्या उसाच्या शेतात मुक्काम ठाेकलेला दिसताे.
यामुळे शिराळा, पाडळी, पाडळेवडी, अंत्री, वाकुर्डे खुर्द, वाकुर्डे बुदुक, बिऊर, उपवळे, कदमवाडी गावातील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. वन खात्याने वेळीच लक्ष घालून या मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात साेडावे. मगरींची पैदास जलाशयामध्ये वाढल्यास ग्रामस्थांना धाेका निर्माण हाेऊ शकताे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.