लोकमत न्युज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे गेल्या चार दिवसांपूर्वी बागणी वाट परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता. आता मंगळवारी दुपारी कृष्णा नदीच्या काठावर सांगलीच्या नवीन पुलाजवळ एक मोठी मगर दिसून आली. ही मगर कसबे डिग्रज बंधाऱ्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा कसबे डिग्रज बागणी वाट रस्त्यावर एका ढाब्याजवळ बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर रात्री दीड वाजताच्या सुमारास धाब्यानजीक बिबट्याने कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यानंतर मादी बिबट्या बछद्यासह उसाच्या शेतातून तुंगच्या दिशेने गेला. त्याच्या पाऊलखुणांवरून माग काढण्याचे काम वनविभाग, प्राणिमित्र, ग्रामस्थ करत आहेत. पण अद्याप बिबट्या आढळून आला नाही.
दरम्यान, ही भीती कायम असतानाच मंगळवारी कृष्णा नदीच्या पात्रात सुमारे दहा फूट लांबीची मगर आढळून आली. ही मोठी मगर पात्राबाहेर मळीभागात आली होती. त्यामुळे ती एखाद्या प्राण्यावर किंवा माणसावर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही वेळाने ती मगर पाण्यातून डिग्रज बंधाऱ्याच्या बाजूने गेली. त्यामुळे पुन्हा एकदा मगरीची दहशत निर्माण झाली आहे.
सध्याच्या काळात नदी पात्रात मगरीची नदीकाठावर वावर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोटारी चालू करणे, पोहणे, जनावरे धुणे किंवा मळीत वैरण काढण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.