सांगली : येथील कृष्णा नदीकाठावर मंगळवारी मगरीचे दर्शन झाले. सांगलीवाडीच्या बाजूला सकाळी नदीकाठावर मगर दिसून आली. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगली बंधारा ते तुंगपर्यंत ४० हून अधिक मगरी असल्याचा अंदाज आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यात नदीकाठावर मगरीचे दर्शन झाले नव्हते. आता पुन्हा नदीकाठावर मगरीचा वावर वाढला आहे. मंगळवारी सांगलीवाडीच्या बाजूला एक सात ते आठ फूट लांबीची मगर शेतात होती. एका तरुणाने या मगरीचे छायाचित्र काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी संजीव जीगी व इतरांनी नदीकाठावर धाव घेत पाहणी केली. पण तोपर्यंत ही मगर पाण्यात गेली होती.
सांगली बंधारा ते बायपास पुलापर्यंत मगरींचा वावर आहे. पद्माळे, तुंगपर्यंत दोन वर्षापूर्वी ४० हून अधिक मगरी आढळून आल्या होत्या. आता त्यात आणखी वाढ झाल्याची शक्यता आहे. सांगलीतील शेरीनाला परिसरात यापूर्वी मगरीचे दर्शन झाले होते.