मिरज : भूत लागल्याची भीती घालून करणी, चेटूक व भूत काढणाऱ्या मंगेश वाघमारे या बुवास अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पोलिसांच्या ताब्यात दिले. बुवाच्याविरोधात शंकरराव चव्हाण यांनी अंनिसच्या मदतीने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वाघमारे यांच्यासह तिघांविरुध्द जादुटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मिरजेतील बांधकाम व्यावसायिक शंकरराव चव्हाण घरात पती-पत्नीतील सतत वाद व जमिनीच्या वादाने अडचणीत आले होते. यातून मार्ग काढण्यासाठी बाळू बुचडे या व्यक्तीने मंगेश वाघमारे या प्रार्थनास्थळात धर्मगुरू म्हणून काम करणाऱ्या बुवाकडे नेले. आपणास दैवी शक्ती प्रप्त असून, तुम्हास ७५ व तुमच्या पत्नीस ७१ भुतांनी झपाटले आहे. भूत काढण्यासाठी प्रत्येक भुतामागे एक हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानुसार चव्हाण यांनी वाघमारे यांना दोन हजार रुपये दिले. त्यानंतर वाघमारे महाराजांनी चव्हाण यांना तुमच्या मेहुण्याने करणी केली असून, तो तुमचा अपघात घडवून मारून टाकेल, असे सांगितले. वाघमारे महाराजाने अस्मिता या आपल्या मुलीचे केस धरून मारहाण करीत भूत काढण्याचा प्रकार केला. या प्रकाराबाबत शंका आल्याने चव्हाण यांनी अंनिसचे अॅड. चंद्रकांत शिंदे, डॉ. प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून बुवाबाजीबद्दल मंगेश वाघमारे, त्यांचे साथीदार अस्मिता वाघमारे, बाळू बुचडे (रा. मिरज) यांच्याविरुध्द शहर पोलिसात फिर्याद दिली. वाघमारे महाराजांकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सांगली अंनिसशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
भूत काढणाऱ्या बुवासह तिघांवर गुन्हा
By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST