इस्लामपूर : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्याशी लग्न करून बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील खासगी रुग्णालयात संबंधित विवाहिता प्रसूतीसाठी दाखल झाल्यावर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब रावसाहेब मंडले (रा. मुडशिंगे, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. एस. एस. जोशी यांनी घटनेची वर्दी दिली आहे. संबंधित विवाहिता गर्भवती असल्याने तिला शहरातील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. तिचे आधार कार्ड पाहिल्यावर ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले; मात्र तिची प्रकृती गंभीर बनत चालल्याने मानवी भूमिकेतून डॉ. जोशी यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. यात या अल्पवयीन मुलीने स्त्री अर्भकाला जन्म दिला.
बाबासाहेब मंडले याने अल्पवयीन मुलीशी विवाह करून बालविवाह कायद्याचा भंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.