महेंद्र किणीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : वाळवा येथे शनिवारी एकाचा घरीच कोरोनामुळे मृत्यू झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत ठिगळे यांनी स्वतः त्याच्या घरी जाऊन मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरून स्मशानभूमीत नेला व तेथे अंत्यसंस्कार केले. सध्या भीतीमुळे कोरोना मृतदेहाची सर्वत्रच हेटाळणी सुरू आहे. अशा स्थितीत श्रीकांत ठिगळे यांनी धाडस दाखवीत अंत्यसंस्कार केले.
श्रीकांत ठिगळे गेल्या वर्षी कोरोना संकट सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांची आपल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा करीत आहेत. वाळवा येथे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या एका रुग्णाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. ही माहिती वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने श्रीकांत ठिगळे यांना फोनवरून याची कल्पना दिली.
ठिगळे हे रुग्वाहिका व दोन सहकाऱ्यांसह मृताच्या घरी आले. या ठिकाणी तिघांनी पीपीई किट घातले. मृतदेह एका प्लास्टिक बॅगमध्ये भरून जंतुनाशकाची फवारणी केली. यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेत घेऊन स्मशानभूमीत गेले. येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आठ दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील वसगडे येथील एक व्यक्ती कोरोनाने वाळवा येथे मयत झाली. यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीही श्रीकांत ठिगळे यांनी पुढाकार घेतला. यावेळी मृताच्या नातेवाइकांनीही ठिगळे यांनी दाखविलेल्या माणुसकीबाबत आभार व्यक्त केले.